मी गुन्हे शाखेच्या सेवेतून मुक्त झालो; वाझेंची प्रतिक्रिया
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात चौकशीच्या घेऱ्यात अडकलेले गुन्हेगारी गुप्त वार्ता विभागाचे सचिन वाझे यांची विशेष शाखा १ मध्ये बदली करण्यात आली असून, नागरी सुविधा केंद्र विभागाचा (सिटीझन फॅसिलिटेशन सेंटर) पदभार त्यांच्याकडे साेपविण्यात आला आहे. ‘मी गुन्हे शाखेच्या सेवेतून मुक्त झालो,’ अशी प्रतिक्रिया वाझे यांनी दिली.
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटके आणि धमकीचे पत्र असलेली स्कॉर्पिओ कार सापडली हाेती. याचा तपास वाझे यांच्याकडे सोपविण्यात आला हाेता. या स्कॉर्पिओ कारचा ताबा असलेल्या ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांचा मृत्यू झाला आणि वाझे संशयाच्या भोवऱ्यात सापडले. विरोधी पक्षाने त्यांचे निलंबन करून अटकेची मागणी केली.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा तपास राज्य दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपविला. विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी गृहमंत्र्यांनी वाझे यांची बदली करण्याचे आदेश दिले. त्यानंतर वाझे यांची बदली कुठे होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर, शुक्रवारी त्यांची विशेष शाखा १ येथे बदली करण्यात आली असून, त्यांच्याकडे नागरी सुविधा केंद्राची जबाबदारी सोपविण्यात आली.
....