सहआयुक्तांचा नियुक्तीला होता विरोध; पोलीस आयुक्तांकडून गृह विभागाला अहवाल सादर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनीच सचिन वाझेची नियुक्ती केल्याचे मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी गृहविभागाला सादर केलेल्या अहवालातून स्पष्ट हाेत आहे. या नियुक्तीला तत्कालीन सहआयुक्तांचा (गुन्हे) विरोध असल्याचेही यात नमूद आहे.
नगराळे यांनी सादर केलेल्या अहवालात, सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या उपस्थितीत ५ जून २०२० रोजी झालेल्या निलंबन आढावा बैठकीत घेण्यात आला. त्यात वाझेची सशस्त्र दलात बदली करण्यात आली होती. ही नेमणूक अकार्यकारी हाेती. त्यानंतर ८ जूनच्या पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीत त्यांची नियुक्ती गुन्हे शाखेत करण्यात आली. परमबीर सिंग यांच्या तोंडी आदेशामुळे वाझेपेक्षा ज्येष्ठ असलेले अधिकारी प्रभारी पोलीस निरीक्षक विनय घोरपडे यांची कक्ष १० तसेच पोलीस निरीक्षक सुधाकर देशमुख यांची कक्ष १ येथे नियुक्ती करून वाझेची गुन्हे अन्वेषण शाखेच्या गुन्हे गुप्त वार्ता (सीआययू) विभागाचा प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे अहवालात नमूद आहे. तत्कालीन पोलीस सहआयुक्त (गुन्हे) यांचा वाझेच्या नियुक्तीला विरोध असतानाही परमबीर सिंग यांनी त्यांची नियुक्ती केल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
नियमानुसार सीआययूच्या अधिकाऱ्याने आधी गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना रिपोर्टिंग करणे गरजेचे होते. मात्र वाझे इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना रिपाेर्ट न करता थेट तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना रिपोर्ट करायचे. सीआययूकडे एकूण १७ प्रकरणांचा तपास होता. यातील हायप्रोफाईल प्रकरणांचा तपास परमबीर सिंग यांच्या सांगण्यानुसार वाझेकडे देण्यात आला होता. त्याच्याच मार्गदर्शनाखाली सर्व तपास सुरू होता.
वाझेने सीआययूमधील सहकाऱ्यांनाही गुन्हे शाखेतील वरिष्ठांना रिपोर्टिंग करण्यास मनाई केली होती. याबाबत गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी परमबीर सिंग यांना सांगितले होते. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. वाझे हे सुमारे नऊ महिने सीआययूच्या प्रभारी पदावर होता. टीआरपी प्रकरण, दिलीप छाब्रिया, मुकेश अंबानी धमकी प्रकरण अशा महत्त्वाच्या प्रकरणांत मंत्री स्तरावरील बैठकीत वाझे हा परमबीर सिंग यांच्यासह हजर असायचा, असेही अहवालात नमूद आहे.
* सरकारी गाडीऐवजी मर्सिडीज, ऑडीतून ये-जा
सरकारी गाड्या उपलब्ध असताना सचिन वाझे मर्सिडिज, ऑडी या वाहनांनी कार्यालयात यायचा, असे पोलीस आयुक्तांकडून गृहखात्याला पाठविण्यात आलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
...............................