सचिन वाझेचा साथीदार रियाझुद्दीन काझीही निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:06 AM2021-04-13T04:06:26+5:302021-04-13T04:06:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : उद्याेगपती मुकेश अंबानी यांच्या ॲंटिलिया निवासस्थानाजवळ सापडलेल्या स्फोटक कार प्रकरणात अटकेची कारवाई होताच सचिन ...

Sachin Waze's accomplice Riazuddin Qazi also suspended | सचिन वाझेचा साथीदार रियाझुद्दीन काझीही निलंबित

सचिन वाझेचा साथीदार रियाझुद्दीन काझीही निलंबित

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : उद्याेगपती मुकेश अंबानी यांच्या ॲंटिलिया निवासस्थानाजवळ सापडलेल्या स्फोटक कार प्रकरणात अटकेची कारवाई होताच सचिन वाझे पाठोपाठ त्याचा साथीदार सहायक पोलीस निरीक्षक रियाझुद्दीन हिसाझुद्दीन काझी याला सेवेतून निलंबित करण्यात आले.

अपर पोलीस आयुक्त (सशस्त्र पोलीस, नायगाव) वीरेंद्र मिश्र यांनी सोमवारी याबाबतचे आदेश काढले आहेत. वाझेच्या अटकेनंतर काझी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर होता. त्याची वेळोवेळी चौकशी करण्यात आली. स्फोटक कार प्रकरणाच्या कटात सहभाग आणि पुरावे नष्ट करण्यामागे महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे काझीला शनिवारी रात्री साडेदहा वाजता अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

काझी हे २०१० च्या पीएसआय बॅचमधील पोलीस अधिकारी आहेत. त्यांची पहिली पोस्टिंग वर्सोवा पोलीस ठाणे येथे करण्यात आली होती.

पोलीस उपनिरीक्षक पदावरून सहायक पोलीस निरीक्षक पदी बढती मिळाल्यानंतर काझीची सीआययू पथकात नियुक्ती करण्यात आली. ९ जूनला सचिन वाझेने सीआययु पथकाचे प्रभारी म्हणून पदभार स्वीकारला. तेव्हापासून काझी हा वाझेसोबत काम करीत होता. त्याच्या जवळचा साथीदार म्हणून त्याची ओळख हाेती.

सीआययुने केलेल्या अनेक महत्त्वाच्या कारवाईत ताे वाझेसोबत कार्यरत होता. वाझे प्रकरणानंतर गुन्हे शाखेतील ६५ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. त्यात काझीची सशस्त्र पोलीस, नायगाव येथे उचलबांगडी करण्यात आली होती.

काझीला अटक केल्यामुळे त्यांना अटकेच्या दिवसापासून सेवेतून निलंबित करण्यात आले. अशात, निलंबनाच्या काळात खासगी नोकरी अथवा धंदा करता येणार नाही, तसे केल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. निलंबन कालावधीत काझीने सहायक पोलीस आयुक्त, नियंत्रण कक्ष यांच्याकडे दररोज हजेरी देणे आवश्यक आहे. तसेच कार्यालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय मुंबईची हद्द सोडता कामा नये असे वीरेंद्र मिश्र यांनी दिलेल्या आदेशात नमूद आहे.

...................

Web Title: Sachin Waze's accomplice Riazuddin Qazi also suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.