Supriya Sule On Sachin Waze ( Marathi News) : राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुका सुरू होणार आहेत. याआधी राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. काही दिवसापूर्वी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. दरम्यान, आता मुंबई पोलिसातील निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देशमुख हे पीए मार्फत पैसे घ्यायचे असं वाझेंनी म्हटले आहे. सचिन वाझे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक पत्र दिल्याचे सांगितले, या पत्रात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नावाचाही समावेश असल्याचे म्हटले आहे.
"अनिल देशमुख पीएमार्फत पैसे घ्यायचे, फडणवीसांना मी एक..."; सचिन वाझेच्या आरोपांनी खळबळ
सचिन वाझे यांनी आज एएनआय या वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला. 'अनिल देशमुख पीए मार्फत पैसे घ्यायचे याचे सीबीआयकडे पुरावे दिले असल्याचे वाझेंनी सांगितले. दरम्यान, आता या आरोपांमुळे राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली. त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे.
सचिन वाझेंनी केलेल्या आरोपावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, या पत्राची वेळ बघा, विधासभेच्या निवडणुका दोन महिन्यावर आल्या आहेत. इतके वर्षे गल्लीपासून दिल्लीपर्यंत यांची सत्ता आहे. गेली दहा वर्षे यांची सत्ता आहे. या गोष्टी आताच कशा काय येतात? गेली अडीच वर्षे त्यांचं सरकार महाराष्ट्रात आहे. बरोबर विधानसभेआधीच हे पत्र, आरोप-प्रत्यारोप कसे काय येतात?, असा सवालही खासदार सुळे यांनी केला. 'अनिल देशमुख यांच्याविरोधातील आरोप आहेत, यात एकही आरोप सिद्ध झालेला नाही. ते सगळं खोट ठरलेलं आहे, १०० कोटी आरोपाचं काही झालेलं नाही.त्यामुळे आता दुसऱ्या कोणाची यात नाव म्हणजे मला आता हे सगळं बालिशपणाचं वाटत आहे, असं प्रत्युत्तर खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले.
'आधी आरोप करायचे नंतर पक्षात प्रवेश द्यायचा'
"महाराष्ट्राचं राजकारण गलिच्छ झाले आहे, बालिशपणाचे आरोप केले जात आहेत.आमचा पक्ष सुसंस्कृत आहे. गलिच्छ गोष्टी आम्ही कधी केल्या नाहीत. भाजपाची स्टाइल आहे ही आधी आरोप करायचे नंतर त्यांनाच आपल्या पक्षात घ्यायचे. पत्र कोणी लिहिलंय? कधी लिहिलंय? मीही उद्या पत्र लिहून आरोप करेन, असं नसतं आयुष्य खूप सिरिअप आहे. आम्ही कधीही खोटे आरोप करत नाही. आम्ही बदल करण्यासाठी राजकारणात आलो, असंही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.