लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आपल्याला बेकायदेशीरपणे अटक केली आहे, असा आरोप करत सचिन वाझे यांनी विशेष एनआयए न्यायालयात अर्ज दाखल केला. ताे न्यायालयाने फेटाळला.
वाझे यांना अटक केल्यानंतर २४ तासांत न्यायालयात हजर केले नाही. तसेच त्यांना अटक करण्यापूर्वी सीआरपीसी ४५ (१) अंतर्गत सरकारकडून परवानगी घेतली नाही. एखाद्या सरकारी अधिकाऱ्याने त्याचे कर्तव्य पार पडताना काही केले तर त्याला अटक करण्यापूर्वी सरकारकडून परवानगी घ्यावी लागते, असा युक्तिवाद वाझे यांच्या वकिलांनी न्यायालयात केला. विशेष सरकारी वकिलांनी यावर आक्षेप घेतला.
वाझे यांना शनिवारी रात्री ११. ५० वाजता अटक करण्यात आली. दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी दुपारी २.४५ वाजता न्यायालयात हजर करण्यात आले. वाझे यांना अटक करण्यासाठी सरकारची परवानगी घेणे आवश्यक नाही. कारण ते त्यावेळी कर्तव्यावर नव्हते, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. त्यावर न्या. पी. आर. सित्रे यांनी वझे यांचा अर्ज फेटाळताना म्हटले की, ते पोलीस अधिकारी आहेत. त्यांना त्यांच्या अधिकारांची जाणीव आहे.
स्टेशन डायरीवरून स्पष्ट होते की, अटकेची माहिती आरोपीला आणि संबंधित पोलीस ठाण्याला दिली होती. याचाच अर्थ अटकेचे कारण देण्यात आले होते. तसेच ते त्यावेळी त्यांचे कर्तव्य बजावत होते की नाही, हे खटल्यादरम्यान तपासण्यात येईल, असे न्यायालयाने म्हटले.
..................