अटक बेकायदेशीर असल्याचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अँटिलियासमोरील स्फोटकांच्या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केलेले निलंबित अधिकारी सचिन वाझे यांच्यावरील कारवाईच्या विरोधात त्यांचे भाऊ सुधर्म वाझे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. सचिन वाझे यांना उच्च न्यायालयात हजर करण्यासाठी त्यांनी हेबियस कॉर्पस दाखल केली आहे. त्यांना एनआयएने बेकायदेशीररीत्या अटक केली, असा आरोप सुधर्म यांनी याचिकेत केला आहे.
वाझे यांना न्यायालयात हजर करावे आणि त्यांची सुटका करावी, अशी मागणी सुधर्म यांनी याचिकेद्वारे केली. मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांना हाताशी धरून आणि त्यांचा वापर करून राजकीय क्षेत्रातील काही नेत्यांनी सचिन वाझे यांना बळीचा बकरा केला आहे. एनआयएच्या कृतीवरून हे स्पष्ट होते की ते कुहेतूने काम करीत आहेत. ते केवळ आपल्या भावाची प्रतिष्ठा मलिन करण्यासाठी हे करीत आहेत, असा आरोप सुधर्म यांनी याचिकेद्वारे केला.
वाझे यांना चुकीच्या पद्धतीने अटक केली. ४१(ए) अंतर्गत नोटीस तसेच एफआयआरची प्रतही दिलेली नाही. त्यांना अटकेचे कारणही सांगण्यात आले नाही. अशा प्रकारे एनआयएने फौजदारी दंडसंहितेचे उल्लंघन केले. एनआयएने वाझे यांना अटक करण्यासाठी केलेल्या घाईवरून त्यांचा कुहेतू स्पष्ट होतो. एनआयए जाणूनबुजून कायद्याचे पालन करीत नाही. त्यामुळे सचिन वाझे यांच्या कायदेशीर अधिकारांचे उल्लंघन होत आहे, असे याचिकेत नमूद आहे.
वाझे यांचा फरार होण्याचा विचार नाही. त्यांनी चौकशीसाठी एनआयएला सहकार्य केले. वाझे गेली १७ वर्षे मुंबई पोलीस दलात उच्च पदावर काम करीत आहेत, असेही याचिकेत म्हटले आहे.
...............................