Join us

सचिन वाझेंची उचलबांगडी, विधान परिषदेत चार वेळा तहकूब झाले कामकाज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 6:05 AM

विधिमंडळात घोषणा; विधान परिषदेत चार वेळा तहकूब झाले कामकाज

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी गंभीर आरोप झालेले मुंबई पोलिसांच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख सचिन वाझे यांची अखेर बदली करण्यात आली आहे. विरोधकांच्या प्रचंड दबावानंतर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये वाझे यांच्या बदलीची घोषणा करण्यात आली. दरम्यान, याच प्रकरणाचा तपास करत असलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने मुंबईत विविध ठिकाणी छापे टाकून धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न केला. 

‘वाझे यांना निलंबित आणि अटक करा’, या मागणीसाठी विरोधकांनी मंगळवारी सभागृह डोक्यावर घेतले होते. विधानसभेत बुधवारी प्रश्नोत्तराचा तास संपताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वाझे यांच्यावर सरकार कधी कारवाई करणार अशी विचारणा करताच भाजपचे सदस्य आक्रमक होऊन पुढे आले. त्यांनी घेतलेला हा आक्रमक पवित्रा पाहता सत्ताधाऱ्यांनीही तत्काळ तितकाच  आक्रमकपणा दाखवला. भाजपचे सदस्य आक्रमक हाेऊन पुढे येताच लगेचच सत्तापक्षाचे आमदारही पुढे  सरसावले पण उपमुख्यमंत्री अजित पवार आणि फडणवीस यांनी आपापल्या बाजूच्या सदस्यांना शांत केले. हा विषय अधिक वाढणार नाही याची काळजी घेतली.  त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी या प्रकरणाबाबत माहिती देताना वाझे यांची बदली करण्यात आली असल्याची घोषणा केली. मात्र, परब यांनी ही घाेषणा केल्यावरही वाझे यांच्या अटकेची मागणी लावून धरत विरोधकांनी वेलमध्ये उतरून फलक झळकावत जोरदार घोषणाबाजी केली त्यामुळे कामकाज चारवेळा तहकूब करावे लागले. या गदारोळातच गृहमंत्र्यांनी मागच्या पाच वर्षांच्या तुलनेत वर्ष २०१९-२० मध्ये महिलांवरील गुन्हे व इतर गुन्ह्यांच्या संख्येत घट झाली असल्याची आकडेवारी मांडली.  

‘सरकार कोणालाही  पाठीशी घालणार नाही’ विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नियम २६० अन्वये राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना  गृहमंत्री देशमुख यांनी वाझे यांच्या बदलीची घोषणा केली.

काय म्हणाले गृहमंत्री?n राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध असून गुन्हेगार कुणीही असले तरी त्यांची गय केली जाणार नाही. n उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणाची चौकशी एनआयएने ताब्यात घेतली असून मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणाची चौकशी राज्य सरकारच्या एटीएस विभागाकडून केली जात आहे. n या प्रकरणी तपास सुरू असून सचिन वाझे असो किंवा आणखी  कोणी असो दोषी असलेल्या कोणालाही  सरकार पाठीशी घालणार नाही. विरोधकांकडे याबाबत कोणतेही पुरावे असतील तर त्यांनी ते सादर करावेत.

निष्पक्ष चौकशीची   सरकारची ग्वाही

वाझेंवरील कारवाईच्या मागणीसाठी विधान परिषदेत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. प्रचंड गदारोळ, घोषणाबाजीत सभागृहाचे कामकाज चारवेळा तहकूब करण्यात आले. शेवटी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाझे यांच्या बदलीची घोषणा केली. हिरेन मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. 

एटीएसने ताब्यात घेतल्या स्टेशन डायरीतील नोंदीमुंबईच्या दहशतवादविरोधी पथकाने मुंब्रा पोलिसांकडून मनसुख यांचा मृतदेह मिळाला, त्या ५ मार्च रोजीच्या स्टेशन डायरीतील नोंदी ताब्यात घेतल्या. वाझे आज मांडणार भूूमिकामनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात आरोपांच्या घेऱ्यात अडकलेले गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे सचिन वाझे यांनी आपली भूमिका गुरुवारी मांडणार असल्याचे माध्यमांना सांगितले. - 

सचिन वाझे म्हणजे लादेन आहे का? - मुख्यमंत्री सचिन वाझे म्हणजे काय ओसामा बिन लादेन आहे का? एका आरोपीला उचलून आणले म्हणून त्याला लटकवताय का? चौकशीत काय ते सत्य बाहेर येईलच पण आधी फाशी अन् मग चौकशी ही कोणती नवी पद्धत आणली आहे, असा हल्लाबोल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.

टॅग्स :सचिन वाझेदेवेंद्र फडणवीसमुख्यमंत्री