ईडीकडील कबुलीतून उलगडले सचिन वाझेचे वसुलीचे रेटकार्ड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:06 AM2021-06-28T04:06:25+5:302021-06-28T04:06:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाची चौकशी करताना केंद्रीय तपास यंत्रणांना बडतर्फ ...

Sachin Waze's recovery rate card revealed from ED's confession! | ईडीकडील कबुलीतून उलगडले सचिन वाझेचे वसुलीचे रेटकार्ड!

ईडीकडील कबुलीतून उलगडले सचिन वाझेचे वसुलीचे रेटकार्ड!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाची चौकशी करताना केंद्रीय तपास यंत्रणांना बडतर्फ सहायक निरीक्षक सचिन वाझे भ्रष्टाचाराच्या दलदलीत किती गुंतला होता हे उलगडले आहे. गुन्ह्याच्या तपास कामापेक्षा रोजच्या वसुलीचे टार्गेट निश्चित करून तो सकाळी घरातून बाहेर पडत असे. मुंबईतील बार, लॉजेसचे स्वरूप आणि ठिकाणावरून त्याचे दर ठरविल्याचे महिन्याला सरासरी दोन ते चार लाख रुपये त्याने ठरविले होते. माजी आयुक्त परमबीर सिंग यांच्या 'लेटर बॉम्ब'मध्ये नमूद तारखेच्या आधीपासूनच वाझेची हप्ता वसुली सुरू होती, असे त्याच्या कबुली जबाबातून समोर आले असल्याचे ईडीतील सूत्रांकडून सांगण्यात आले.

स्फोटक कार व मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या सचिन वाझेचे सीबीआय व ईडीच्या अधिकाऱ्यांनी तळोजा जेलमध्ये जाऊन स्वतंत्रपणे जबाब नोंदविले आहेत. यामध्ये आर्थिक गैरव्यवहार, हवाला प्रकरण मोठ्या प्रमाणात झाल्याने ईडीसमोर त्यातून अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. परमबीर सिंग यांनी त्यांच्या पत्रात तत्कालीन गृहमंत्री देशमुख, त्यांचे खासगी सचिव संजीव पलांडे व सहायक कुंदन शिंदे यांनी वाझेला फेब्रुवारीच्या मध्यावर १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचे नमूद केले आहे.

प्रत्यक्षात त्याने जबाबामध्ये डिसेंबर २०२० मध्ये पलांडे यांना ४० लाख 'गुडबुक' म्हणून दिले होते. तसेच डिसेंबर ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत एकूण ४.७० कोटी शिंदे व पलांडे यांच्याकडे पोहोचविले असल्याचे म्हटले आहे. त्यापैकी परिमंडळ १ ते ६ आणि ७ ते १२ या विभागातून दोन टप्प्यांत त्याची वसुली केली होती. बार, लॉजेसचे ठिकाण व व्याप्तीनुसार प्रत्येकी २ ते ४ लाख घेतल्याची त्याने ईडीकडे कबुली दिली आहे.

परमबीर सिंग यांचीही चौकशी ?

अनिल देशमुख यांनी फेब्रुवारी महिन्यात बंगल्यावर बोलावून वसुलीचे टार्गेट दिले होते, असा परमबीर सिंग यांचा आरोप आहे. मात्र, वाझे हा त्याच्या आधीपासूनच वसुली करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यावेळी त्याला त्याबाबत कोणी सूचना केल्या होत्या? तो थेट परमबीरसिंग यांनाच रिपोर्ट करीत असल्याने त्यांनी त्याला संमती दिली होती का? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. यासाठी ईडी परमबीर सिंग यांच्याकडेही लवकरच चौकशी करून जबाब नोंदविणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Sachin Waze's recovery rate card revealed from ED's confession!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.