सचिन वाझे यांचा जबाब नोंदविला, पीपीई किट घालून पुन्हा फेरी!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 05:21 AM2021-03-10T05:21:57+5:302021-03-10T05:22:05+5:30
हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी तपासासाठी एटीएसच्या मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक युनिटमधील अधिकाऱ्यांची १० पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येकाकडे वेगवगेळी जबाबदारी सोपविण्यात आली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाच्या तपासासाठी राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून (एटीएस) तपास सुरू आहे. दरम्यान, उद्याेगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरणाचा तपास करणारे आणि हिरेन यांच्या मृत्यूमुळे संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले सचिन वाझे यांचीही चौकशी करून त्यांचा जबाब नोंदविण्यात आला.
हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी तपासासाठी एटीएसच्या मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक युनिटमधील अधिकाऱ्यांची १० पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येकाकडे वेगवगेळी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यात, हिरेन यांच्या कॉल डिटेल्ससह, सीसीटीव्ही तपासणी, डिजिटल पुरावे गोळा करणे तसेच घटनाक्रमाचे रिक्रिएशन करण्यासह तपासासंबंधीच्या विविध पैलूंचा शोध घेण्यात येत आहे. वाझे यांचाही जबाब नोंदविण्यात आल्याचे एटीएसच्या सुत्रांनी सांगितले. त्यांच्याकडे आतापर्यंत केलेला तपास आणि त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांबाबतही चौकशी करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.
गाडी ताब्यात असणे हा आराेप हाेऊ शकत नाही - सचिन वाझे
आरोपांची माहिती घेऊन त्यानुसार उत्तर देण्यात येईल, असे सीआययू प्रमुख सचिन वाझे यांनी सांगितले. तसेच याबाबत जास्त बोलणे टाळले. स्कॉर्पिओबाबत विचारणा करताच गाडी ताब्यात असणे हा आरोप हाेऊ शकत नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. माझ्यावर काय आरोप केले आहेत, हे बघून त्यानुसार पुढील माहिती दिली जाईल. सध्या तपासाबाबत माध्यमांसमोर काहीही बोलणे योग्य नसल्याचे त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना
सांगितले.
पीपीई किट घालून पुन्हा फेरी!
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाच्या परिसरात जिलेटिन कांड्या असलेली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सोडल्यानंतर दुसरे वाहन इनोव्हाचा चालक पुन्हा त्या ठिकाणी पाहणी करून गेला होता. ओळख लपविण्यासाठी त्याने कोविड योद्ध्याप्रमाणे पीपीई किट परिधान केले होते, असे दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) तपासलेल्या सीसीटीव्ही फूटेजमधून समाेर आले आहे. त्यानुसार अधिक चाैकशी सुरू आहे.
एनआयएने ताब्यात घेतली स्फोटक कारच्या गुन्ह्याची कागदपत्रे
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराच्या परिसरात आढळलेल्या स्फोटक कारच्या तपासाची कागदपत्रे मंगळवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकाकडे वर्ग करण्यात आली. एटीएसने त्याबाबत जप्त केलेल्या वस्तू, सीसीटीव्ही फुटेज व अन्य पुरावे ताब्यात घेतले.
गावदेवी पोलीस ठाण्यात याबाबत मूळ गुन्हा दाखल आहे. एनआयए या संदर्भात लवकरच मुंबई क्राईम ब्रँचच्या सीयूआय पथकाचे साहाय्यक निरीक्षक सचिन वाझे यांच्याकडून केलेल्या तपासाची माहिती घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
केंद्रीय गृह विभागाने हा तपास एटीएसकडून काढून घेऊन एनआयएला करण्याचे आदेश सोमवारी (दि. ८) दिले. त्यानुसार एनआयए मुंबई विभागातील एका पथकाने त्याबाबत कार्यवाही सुरू केली. मंगळवारी गुन्हा दाखल करण्यासंदर्भातील सर्व तांत्रिक
बाबींची पूर्तता झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी एटीएसने केलेल्या तपासाची माहिती घेतली.
गुन्ह्याच्या उकलीसाठी त्यांनी जमा केलेले पुरावे, जबाब व अन्य वस्तू जप्त केल्या. सर्व संबंधितांकडे चाैकशी करण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
घटनास्थळाची पाहणी करून चौकशी करण्यात येणार आहे. शिवाय नव्याने जबाब नोंदविले जाणार असल्याचे सांगण्यात आले.