Join us

सचिन वाझेची स्पोर्ट्स बाइक दमणमधून जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 4:06 AM

* एनआयएची कारवाईलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : स्फोटक कार व मनसुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझेच्या ...

* एनआयएची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : स्फोटक कार व मनसुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझेच्या महागड्या गाड्या जप्त केल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आता त्याची स्पोर्ट्स बाइक दमण येथून जप्त केली आहे. सोमवारी ही महागडी मोटारसायकल एका टेम्पोतून एनआयएच्या कार्यालयात आणण्यात आली.

वाझेचे आर्थिक व्यवहार हाताळणारी मीना जॉर्ज या महिलेच्या नावावर तिची नोंदणी करण्यात आली होती, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. १३ मार्चपासून एनआयएच्या ताब्यात असलेला वाझे वापरत असलेल्या एकूण ८ आलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय, ऑडी व इको कारचा शोध घेण्यात येत आहे.

वाझेच्या ट्रायडंट हॉटेलमधील वास्तव्यावेळी त्याला भेटण्यासाठी गेलेल्या मीरा रोड येथील मीना जॉर्ज या महिलेकडे एनआयएने सुमारे १५ तास कसून चौकशी केली आहे. तिच्याकडून वाझेच्या हप्तावसुलीतून जमा होणाऱ्या रकमेबद्दल महत्त्वपूर्ण तपशील मिळाले आहेत. तिच्या नावे असलेली स्पोर्ट्स बाइक दमण येथे असल्याचे स्पष्ट झाल्यावर शनिवारी एक पथक तिकडे रवाना झाले होते. त्यानंतर, एका टेम्पोतून ती मोटारसायकल मुंबईला आणण्यात आली. तिची किंमत काही लाखांत असल्याचे समजते. ही बाइक मीनाचा मुलगा वापरत असल्याचे सांगण्यात आले.

एनआयएने मागच्या रविवारी मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने मिठी नदीतून डीव्हीआर, सीपीयू, हार्डडिस्क आणि कॉम्प्युटर या वस्तू शोधून काढल्या होत्या. त्यांच्या फॉरेन्सिक तपासणीसाठी त्या लॅबमध्ये पाठवण्यात आल्या आहेत.