Join us

शानदार सोहळ्यात झाले सचिनच्या आत्मचरित्राचे प्रकाशन

By admin | Published: November 05, 2014 7:56 PM

मुंबईतील शानदार सोहळ्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या 'प्लेईंग इट माय वे' या बहुप्रतिक्षित आत्मचरित्राचे प्रकाशन पार पडले.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ५ - मुंबईतील शानदार सोहळ्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या 'प्लेईंग इट माय वे' या बहुप्रतिक्षित आत्मचरित्राचे प्रकाशन पार पडले. सोहळ्यादरम्यान या पुस्तकाची एक प्रत सचिनने त्याचे गुरू रमाकांत आचरेकर यांना भेट देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.यावेळी सचिनचा भाऊ अजित तेंडुलकर, पत्नी अंजली, मुलगी सारा हिच्यासह ज्येष्ठ क्रिकेटपटू वासू परांजपे, सुनील गावस्कर, रवी शास्त्री, दिलीप वेंगसरकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, व्ही.व्ही.एस लक्ष्मण आदी दिग्गज उपस्थित होते. प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहण्यापूर्वी सचिनने त्याच्या आईला या पुस्तकाची पहिली प्रत अर्पण केली. 
या सोहळयादरम्यान सर्वांनी सचिनच्या कारकिर्दीतील अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. सचिनचा भाऊ अजितने सचिनच्या कारकिर्दीतील सुरूवातीचे टप्पे उलगडून सांगितले. तो सचिनला रमाकांत आचरेकर सरांकडे घेऊन गेला तेव्हापासून ते सचिनच्या कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यातील अखेरच्या खेळीपर्यंतच्या अनेक आठवणी त्याने सांगितल्या. 
तर आपण सचिनला प्रथम भेटलो तेव्हा तो कोण आहे हे आपल्याला माहीतही नव्हते, पण तेव्हा तो खूप गोड मुलगा वाटला होता असे सांगत अंजली तेंडुलकरने तिच्या व सचिनच्या प्रथम भेटीचा किस्सा कथन केला. आपण पहिल्यांदा त्याच्या घरी पत्रकार म्हणून कसे गोले, तसेच लग्नासंदर्भात सचिनच्या घरच्यांची परवानगी कशी विचारली असे अनेक किस्से तिने उलगडले. 
सुनील गावस्कर, रवी शास्त्री आदी दिग्गजांनी सचिनच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. सरावाच्या वेळी, नेट्समध्ये दिग्गजांना सचिनने कसे तोंड केले याची आठवण वेंगसरकरांनी सांगितली. तर रवी शास्त्रीने पाकिस्तानच्या दौ-यादरम्यानच्या सचिनच्या आठवणी सांगितल्या. त्यावेळी सचिन त्याच्या वयाला साजेसा उतावळा होता, आणि पाण्याबाहेरच्या माशासारखा तडफडत होता. मात्र ज्यावेळी हा दौरा संपला त्यावेळी सगळ्यांना कळलं होतं की सचिन हा समुद्रातला मोठा शार्क मासा आहे आणि समुद्रावर त्याची सत्ता चालते, असे शास्त्री यांनी सांगितले. तर सचिनने ज्यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केलं त्याचवेळी मी भाकित केलं होतं की जगातला सर्वोत्कृष्ट फलंदाज मैदानावर आहे. माझे ते शब्द १९९२ साली पूर्ण झाले अशा शब्दात वासू परांजपे यांनी सचिनचं कौतुक केलं.
सचिन सोबत खेळलेल्या ड्रेसिंग रूम शेअर केले्या राहुल द्रविड, लक्ष्म, सौरव गांगुलीनेही त्याचे अनेक किस्से सांगितले. जो सचिन भल्याभल्या गोलंदाजांची झोप उडवायचा, तोच सचिन रात्री झोपेत चालायचा अशा गौप्यस्फोट सचिनचा रुमपार्टनर असलेल्या सौरव गांगुलीने केला आणि सर्व सभागृहात हास्याचा फवारा उडाला. तर  सचिन आणि माझ्यात मतभेद होते मात्र तो क्रिकेटमधला अपरीहार्य भाग होता. पण काहीही असलं तरी सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की मी आणि सचिन आजही चांगले मित्र आहोत, असं सांगत राहुल द्रविडने सचिनचे कौतुक केले. आम्ही खेळत असताना केवळ क्रिकेटच्या भल्याचा विचार करायचो, आमच्यात कधीही स्पर्धा  नव्हती, आम्ही एकत्र मिळून विरोधकांचा सामना करायचो, अशी आठवण व्ही.व्ही.एस. लक्ष्मणनेही सांगितली. तर ग्रेग चॅपेल कोच असताना ड्रेसिंग रूममधलं वातावरण चांगलं नव्हतं. अत्यंत नकारात्मक वातावरण असल्यामुळे त्याचा परिणाम संघावर झाला. २००७च्या वर्ल्ड कपमध्ये चॅपेल कोच नसावेत असं माझंच नाही तर अनेक सीनियर खेळाडूंच मत होतं, असं सचिनने सांगितलं. आपल्या दोन दशकांहून अधिक काळच्या कारकिर्दीत अनेक चढउतार पाहिल्याचे सांगत हा प्रवास अविस्मरणीय असल्याचेही तो म्हणाला.