मुंबई : शहरातील वाढत्या वाहतूककोंडीमुळे मुंबईकर कमालीचे त्रस्त आहेत. हीच वाहतूककोंडी सोडवण्यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आता सरसावला आहे. सचिनने केवळ वाहतूककोंडीवर नाराजी व्यक्त न करता ती सोडवण्यासाठी उपायदेखील सुचविले आहेत. मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाहा यांना याबाबत त्याने पत्र पाठवले आहे. त्यात जलवाहतुकीचा पर्याय सुचवण्यात आला आहे. रस्ते आणि पादचारी पुलांवरील होणारी गर्दी लक्षात घेता स्वतंत्र फेरीवाला क्षेत्र निर्माण करा, असे सचिनने सुचविले आहे.देशातील सर्वाधिक गर्दीच्या शहरांच्या यादीत मुंबई पहिल्या क्रमांकावर आहे. वाहतूकतज्ज्ञ आणि देशी-विदेशी सर्वेक्षणाच्या अहवालामध्ये मुंबईच्या गर्दीबाबत भाष्य केले जाते. ही कोंडी फोडण्यासाठी उपायदेखील सुचवण्यात आले होते. मात्र अद्याप ते कागदावर आहेत. त्यामुळे गर्दी, वाहतूककोंडीतून प्रवास करावा लागतो. मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेचा मूळ कणा रेल्वेमार्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून जादा लोकल सोडण्याची क्षमता पूर्ण झाल्याने आता अधिक लोकल सोडणे अशक्य असल्याचे रेल्वे अधिकारी खासगीत कबूल करतात. शहरांतील रस्त्यांची अवस्था सर्वश्रुत आहे. शहरांत ठिकठिकाणी विकासकामे सुरू असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. जलवाहतूक सुरू झाल्यास त्यामुळे प्रदूषणाला आळा बसेल, शिवाय दरदेखील परवडणारे असल्यामुळे सर्वसामान्यांचा चांगला प्रतिसाद लाभेल. यामुळे हाँग काँगच्या धर्तीवर जलवाहतूक सुरू केल्यास फायदा होईल, असे सचिनने जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाहा यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.मुंबईच्या बहुतांश रस्त्यांवर, पदपथांवर, पादचारी पुलांवर फेरीवाल्यांचे अनधिकृत साम्राज्य असते. त्यामुळे खाद्यपदार्थांसाठी स्वतंत्र जागेची व्यवस्था करावी, फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र फेरीवाला क्षेत्र निर्माण करावे; तसेच आठवडा बाजार ही संकल्पना योग्यपणे राबवल्यास स्थानकांसह रस्त्यांवरील फेरीवाल्यांच्या गंभीर समस्येचे निराकरण करता येईल, असेदेखील सचिनने सुचवले आहे.मुंबईकरांना आवाहनप्रशासन, जनता एकत्र आल्यास बहुतांश समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघू शकेल. वाहतूककोंडीमुळे शहरात मोठ्या प्रमाणावर वायुप्रदूषण होते. हे टाळण्यासाठी शक्य तेथे पायी अथवा सायकलने प्रवास करा; रस्त्यावर कचरा टाकू नये, वाहतुकीच्या नियमांचे पालन करा, असे आवाहन सचिनने मुंबईकरांना केले.
वाहतूककोंडी सोडविण्यासाठी सचिनची बॅटिंग! जिल्हाधिका-यांना लिहिले पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 2:06 AM