मुंबई : कोणत्याही खेळात यशस्वी कामगिरी करण्यासाठी फिट राहणे आवश्यक आहे. तंदुरुस्तीसाठी मैदानी सराव हाच एकमेव उपाय आहे, असा फिटनेस मंत्र मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दिला. मुंबईत आॅगस्टमध्ये होणाऱ्या पहिल्या अर्धमॅरेथॉनचा सदिच्छादूत म्हणून सचिनच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्या कार्यक्रमात सचिनने तंदुरुस्तीचा कानमंत्र दिला.अॅथलेटिक्स फेडरेशन आॅफ इंडियाच्या मान्यतेने होणारी अर्धमॅरेथॉन मुंबईसह दिल्ली, कोलकाता या शहरांत देखील रंगणार आहे. सचिनच्या तंदुरुस्तीबाबत विचारले असता तो म्हणाला, की हल्ली तरुणाई मैदानी सरावापेक्षा मोबाइलमध्ये जास्त व्यस्त असते. त्यामुळे नवोदित खेळाडूंना यशाच्या उंबरठ्यावर असताना तंदुरुस्तीचा प्रश्न सतावू लागतो. त्यामुळे शक्य तेवढा वेळ मैदानात घालवून तंदुरुस्तीसाठी घाम गाळावा, असा मोलाचा सल्ला सचिनने खेळाडूंना दिला. मुंबईतील ऐतिहासिक स्थळे जपण्यासाठी अर्धमॅरेथॉनमधील काही रक्कम ऐतिहासिक स्थळांसाठी देण्यात येणार आहे. अर्धमॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी सुरू झाली असून २१ आॅगस्ट रोजी ही मॅरेथॉन पार पडणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. (क्रीडा प्रतिनिधी)