मुंबई महापालिका बरखास्त करा
By admin | Published: May 12, 2016 03:10 AM2016-05-12T03:10:17+5:302016-05-12T03:10:17+5:30
मुंबई महापालिकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार बोकाळला आहे. सत्ताधारी भाजपा नेतेच पालिकेतील भ्रष्टाचाराची कबुली देत आहेत. त्यामुळे मुंबई महापालिका ताबडतोब बरखास्त करावी.
मुंबई : मुंबई महापालिकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार बोकाळला आहे. सत्ताधारी भाजपा नेतेच पालिकेतील भ्रष्टाचाराची कबुली देत आहेत. त्यामुळे मुंबई महापालिका ताबडतोब बरखास्त करावी. तसेच पालिकेतील भ्रष्ट कारभाराची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी मुख्यमंत्र्यांकडे एका पत्राद्वारे केली आहे..
निरुपम म्हणाले, की महापालिकेतील व्यवस्था संपूर्णत: कोलमडलेली आहे. अधिकाऱ्यांवर नगरसेवकांचा विश्वास नाही. सत्तारूढ शिवसेना-भाजपा नेते एकमेकांवर दररोज भ्रष्टाचाराचे आरोप करीत आहेत. या सर्व प्रकाराला मुंबईकर आता कंटाळले आहेत. महापालिकेची प्रतिमा मलिन झाली असेल आणि भ्रष्टाचार नियंत्रणाच्या बाहेर गेल्यास सदर महापालिका बरखास्त करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ चे कलम ५२०-डी च्या अन्वये मुंबई महापालिका ताबडतोब बरखास्त करावी.
तसेच पालिका बरखास्त केल्यानंतर भ्रष्टाचाराला जबाबदार असणाऱ्यांविरोधात कायदेशीर गुन्हा दाखल करून कारवाई सुरू करावी. भ्रष्टाचाराच्या सर्व प्रकरणांच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाच्या वर्तमान किंवा माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमावा, अशी मागणी निरुपम यांनी केली.
स्वत: मुख्यमंत्री आणि त्यांचा पक्ष भ्रष्टाचाराच्या विरोधात असल्याचा दावा वारंवार केला जातो. मग मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावर कारवाई का केली जात नाही, असा सवाल निरुपम यांनी केला. (प्रतिनिधी)