शरद पवारांच्या घरावर हल्ल्याप्रकरणी बडतर्फ ST कर्मचारी पुन्हा सेवेत; मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 06:29 PM2022-10-07T18:29:17+5:302022-10-07T18:30:04+5:30
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संप काळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्या प्रकरणी बडतर्फ करण्यात आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुंबई-
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संप काळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्या प्रकरणी बडतर्फ करण्यात आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बडतर्फ झालेले ११८ कर्मचारी कर्मचारी पुन्हा सेवेत रूजू होणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर मुंबई सेंट्रल एसटी मुख्यालयामध्ये जल्लोष साजरा करणार आहेत. अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील यावेळी उपस्थितीत राहणार आहेत.
एसटीच्या कर्मचाऱ्यांनी ठाकरे सरकारच्या काळात पगारवाढ आणि इतर मागण्यासाठी जवळपास सहा महिने संप पुकारला होता. राज्य सरकारकडून मागण्या मान्य होत नसल्यामुळे संतापलेल्या संपकऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील घरावर हल्ला केला होता. यावेळी शरद पवार यांच्या घरावर दगडफेक देखील करण्यात आली होती. त्यामुळे तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब यांच्या आदेशानुसार ११९ आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं होतं. शिवाय हल्ल्याप्रकरणी बडतर्फ करण्यात आलेल्या या कमचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्यात येणार नसल्याचंही सांगण्यात आलं होतं. परंतु, आता मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे या कर्मचाऱ्यांना पुन्हा एसटी सेवेत सामावून घेण्यात येणार आहे.
शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी काही कर्मचाऱ्यांना अटक देखील करण्यात आली होती. यातील चार आरोपींपैकी दोन आरोपींनी या प्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्तेंचं नाव घेतलं होतं. त्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबई पोलिसांनी त्यांना अटकही केली होती. या आंदोलनाप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबतच इतर १०९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि तुरुंगवासही भोगावा लागला होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"