Join us

बीडीडी चाळीसाठी गृहनिर्माण मंत्र्यांना घातले साकडे 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 1:21 PM

या प्रकल्पास अंतिम मान्यता मिळविण्याबाबत शासनाच्या वतीने तत्काळ पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी शिष्टमंडळाला दिले.

मुंबई : रखडलेल्या शिवडी बीडीडी चाळीचा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी अखिल बीडीडी चाळ नवनिर्माण वेल्फेअर रहिवासी संघाच्या शिष्टमंडळाने गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांना साकडे घातले. यावेळी शिवडी येथील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाबाबत केंद्र आणि राज्य सरकारची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येईल, या प्रकल्पास अंतिम मान्यता मिळविण्याबाबत शासनाच्या वतीने तत्काळ पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी शिष्टमंडळाला दिले.

चाळींच्या पुनर्विकासाचे काम वेगाने होत असले तरी शिवडी येथील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाबाबत हालचाल केली जात नाही. त्यामुळे या मुद्द्याकडे लक्ष वेधण्यासाठी अखिल बीडीडी चाळ नवनिर्माण वेल्फेअर रहिवासी संघाचे सल्लागार, मनसे नेते बाळा नांदगावकर, आमदार अजय चौधरी व शिष्टमंडळाने गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची भेट घेतली. यावेळी सावे यांनी शिष्टमंडळाचे प्रश्न ऐकून वरळी, ना. म. जोशी आणि नायगावमधील रहिवाशांच्या मागण्यांबाबतही शासन स्तरावर निर्णय घेत दिलासा दिला जाईल, असे सांगितले.

टॅग्स :अतुल सावेमुंबई