Join us  

जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही वैगेरे ऐकून कान विटले - उद्धव ठाकरे

By admin | Published: May 05, 2017 8:30 AM

हिंदुस्थानी जवानांच्या शिरच्छेदाचा बदला पाकडय़ा हायकमिशनरला सुका दम देऊन घेतला जातो हे आता समजले

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5 - हिंदुस्थानी जवानांच्या शिरच्छेदाचा बदला पाकड्या हायकमिशनरला सुका दम देऊन घेतला जातो हे आता समजले. देशाला वाटले होते, दोन शिरच्छेदाच्या बदल्यात पाकडय़ांची पन्नास मुंडकी येथे आणून विजयोत्सव साजरा केला जाईल, पण हरकत नाही. पुरावे गोळा केले आहेत, रक्ताचे नमुने घेतले आहेत, चर्चाही सुरू आहेत. बदल्याचे काय ते नंतर पाहता येईल असा सणसणीत टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून केला आहे. 
 
हिंदुस्थानच्या दोन जवानांचा शिरच्छेद झाल्यावर दिल्लीने काय कारवाई केली? असा प्रश्न देशवासीयांना पडला आहे. अर्थात दिल्लीने तत्काळ कारवाई केली, पाकिस्तानचे दिल्लीतील मुजोर हायकमिशनर अब्दुल बासीत यांना बोलावून संताप व्यक्त केला. हा संताप आणि दम इतका जबरदस्त होता की, हे बासीत महाशय विदेश मंत्रालयाच्या दारातून प्रसन्नचित्ताने बाहेर पडतानाची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत अशी उपरोधिक टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. 
 
बासीत महाशय दिल्लीत बसून हिंदुस्थानविरोधी शक्तींना नेहमीच फूस लावत असतात, पाकिस्तानचा जन्मदिवस साजरा करतात व कश्मीरातील फुटीरतावाद्यांना खास निमंत्रित म्हणून बोलावतात, कश्मीरप्रश्नी आमच्याविरुद्ध गरळ ओकतात. अशा प्रत्येक वेळी या बासीत मियाँना बोलावून केंद्र सरकारने निषेध व्यक्त केला आहे, पण उपयोग काय! पाकिस्तानचे रक्तपाती उद्योग थांबले काय? आता तर दोन हिंदुस्थानी जवानांचा शिरच्छेद करून त्यांनी ‘हे कृत्य आम्ही केलेच नाही’ असे सांगून काखा वर केल्या. वास्तविक जवानांच्या शिरच्छेदाचे अमानुष कृत्य पाकडय़ांचेच आहे. याबाबतचे ठोस पुरावेदेखील म्हणे बासीत यांच्या तोंडावर मारण्यात आले, पण त्यामुळे त्यांच्या थोबाडावरची सुरकुती तरी हलली काय? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. 
 
पठाणकोट हल्ल्याबाबत आपल्या देशाने पाकिस्तानला काय कमी पुरावे दिले? पाकिस्तानी विशेष तपास पथकाला या विमानतळाला भेट देण्याची परवानगीदेखील देण्यात आली. मात्र हिंदुस्थानने एवढे सौजन्य दाखवूनही ‘या हल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही’ हीच नकारघंटा त्या देशाने वाजवली. ‘उरी’ हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचा हिंदुस्थानचा आरोपदेखील त्या सरकारने फेटाळला. आम्ही पाकिस्तानी सहभागाचा आरोप करायचा, त्याचे पुरावे द्यायचे आणि पाकिस्तानने ते नाकारायचे. पुन्हा ‘पाकिस्तानवर आरोप करण्याची हिंदुस्थानची सवयच आहे’ अशी खिल्लीही उडवायची. वर्षानुवर्षे हेच सुरू आहे असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 
 हिंदुस्थानातील आजवरच्या प्रत्येक दहशतवादी हल्ल्याचे सूत्रधार पाकिस्तानी आयएसआय, लष्कर किंवा पाकपुरस्कृत दहशतवादी संघटनाच राहिल्या आहेत. मात्र प्रत्येक वेळी त्यांच्या पापाचे पुरावे तोंडावर मारूनही पाकडय़ांचा दहशतवाद आणि कश्मीरातील हिंसाचार थांबलेला नाही. कश्मीरात दिवसाढवळय़ा बँका लुटल्या जात आहेत, जवानांवर हल्लेही सुरूच आहेत, पण सरकारने बासीत महाशयांना बोलावून पाकिस्तानी कृत्याचे पुरावे समोर फेकले व दम भरला. दोन जवानांच्या निर्घृण अशा शिरच्छेदाचा हा सूड म्हणावा की विटंबना तेच कळत नाही असा संताप उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. 
 
 ‘जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही’ वगैरे वक्तव्ये ऐकून आता कान विटले आहेत. शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा आक्रोश तर मेंदू बधिर करीत आहे. बासीत यांना विदेश मंत्रालयात झाडाझडतीसाठी बोलावले त्यावेळी शिरच्छेद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना तिथे बोलावले असते तर बासीतची सालटीच निघाली असती व प्रसन्न मुद्रेने ते बाहेर पडतानाची छायाचित्रे प्रसिद्ध झाली नसती. निर्लज्ज आणि कोडग्यांना शब्दांचा मार पुरा पडत नाही, त्यांना तुडवायलाच हवे असं स्पष्ट मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं आहे.