मुंबई : शिवसेनेने सहा नगसरेवक पळविल्यानंतर मनसेचे मुंबई महापालिकेतील अस्तित्वच धोक्यात आले. त्यामुळे आपला प्रभाव अद्याप कायम असल्याचे दाखवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी उमेदवार रिंगणात नसतानाही लोकसभा निवडणूक महत्त्वाची ठरली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांनी प्रचंड गर्दी खेचली आणि चर्चेचा विषयही ठरली. परंतु मनसे फॅक्टरचा प्रभाव निकालात काही दिसून आला नाही.काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याच्या राज ठाकरे यांच्या निर्णयाने स्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्येच संभ्रम निर्माण झाले होते. तरीही त्यांच्या सभा आणि त्यात भाजप सरकारच्या कारभाराची व्हिडीओद्वारे होणारी चिरफाड प्रचंड चर्चेत आली. त्यांच्या सभांविषयी उत्सुकता असल्याने लोकांची गर्दी वाढू लागली. प्रत्येक सभेत लावण्यात येणारे भाजपविरोधातील व्हिडीओ पाहण्यासाठी गर्दी होत असे. व्हिडीओ लावण्यासाठी ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिलेला ‘लाव रे तो व्हिडीओ’चा इशारा प्रचंड गाजला. त्याचे टी-शर्टही निघाले. भाजपने जाहीर केलेल्या योजना, त्यांच्या यशाचा दावा खोडून काढण्यासाठी त्या लाभार्थींना प्रत्यक्ष मनसेच्या व्यासपीठावर आणण्यात येऊ लागले. त्यामुळे मनसेच्या सभांची हजेरी वाढली. मात्र काँग्रेसच्या पाच आणि राष्ट्रवादीची एक अशा सहाही जागांवर आघाडीचा दारुण पराभव झाला. त्यामुळे मनसे फॅक्टर निर्णायक ठरेल हा दावाच फोल ठरला.मतमोजणीच्या पहिल्याच फेरीत हा पराभव दिसून आल्याने मनसेच्या पक्ष कार्यालयाबाहेरही शुकशुकाटच दिसला. आमचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नव्हते, असा बचाव मनसे कार्यकर्ते काही ठिकाणी करताना दिसले. परंतु दादर येथील पक्ष कार्यालयाचे रंग उडाल्याचे दिसून येत होते.विशेष म्हणजे रस्त्याच्या पलीकडे म्हणजेच शिवसेना भवन येथे विजयाचा प्रचंड जल्लोष सुरू असताना दुसऱ्या गल्लीत असलेल्या मनसे कार्यालयाबाहेर शांतता होती. मतदानापूर्वी शिटी वाजविणारे इंजीन यार्डातून निघालेच नाही, यामुळे मनसे कार्यकर्तेही निरुत्साही दिसून आले.
राज ठाकरे यांच्या सभांचा फायदा न झाल्याचे दु:ख
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 1:28 AM