Raj Thackeray: सगळे प्रकल्प गुजरातला जात असतील तर...; राज ठाकरेंनी पंतप्रधानांना करून दिली जबाबदारीची जाणीव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 12:44 PM2022-10-31T12:44:48+5:302022-10-31T12:46:13+5:30
महाराष्ट्रात येणारा प्रत्येक प्रकल्प गुजरातला जातोय हे वाईट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर विचार करायला हवा, असं विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे.
मुंबई-
महाराष्ट्रात येणारा प्रत्येक प्रकल्प गुजरातला जातोय हे वाईट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर विचार करायला हवा, असं विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. ते मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. गुजरातमध्ये प्रकल्प गेले असले तरी महाराष्ट्र राज्यच देशात अग्रेसर असल्याचंही राज म्हणाले.
मुंबईत पक्ष बांधणी संदर्भात वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांनी संबोधित केलं. मनसेच्या बैठकीनंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी राज ठाकरे यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात जोरदार काम सुरू असल्याचं म्हटलं. आगामी काळात पक्षाचे विविध स्तरावर मेळावे होणार असल्याचंही सांगितलं. महाराष्ट्रात येणारे अनेक प्रकल्प गुजरातला जात असल्यामुळे सरकारवर टीका होत असल्याचं राज ठाकरे यांना विचारण्यात आलं असता त्यांनीही ही दुर्दैवी गोष्ट असल्याचं म्हटलं आहे.
"माझी पहिल्यापासूनची भाषणं काढून बघितलीत तर माझं मत हेच की, पंतप्रधान हे देशाचे हवेत. त्यांना प्रत्येक राज्य हे समान मुलांसारखं असलं पाहिजे. महाराष्ट्रातला हा प्रकल्प आसामला गेला असता तर वाईट नसतं वाटलं. पण वाईट याचं वाटतंय की जो प्रकल्प येतोय, तो गुजरातला जातोय. पंतप्रधानांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे", असं राज ठाकरे म्हणाले.
"प्रत्येक राज्य मोठं झालं पाहिजे. प्रत्येक राज्यात उद्योग आले पाहिजेत. तिथल्या लोकांना घर सोडून बाहेर जायची, अन्य राज्यावर ओझं व्हायची गरज नाही. असे प्रकल्प राज्याराज्यांत गेले, तर देशाचाच विकास होईल. महाराष्ट्र हे राज्य आजही उद्योगधंद्यांच्या बाबतीत इतर कोणत्याही राज्यांपेक्षा पुढे आहे. उद्योगपतींचीही पहिली पसंती महाराष्ट्रच असते. गुजरातमध्ये जास्त फॅसिलिटी आणि महाराष्ट्रात नाही असा अर्थ होत नाही", असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.
सध्याचं राजकारण खालच्या पातळीवर
राज्यात राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांबाबत बोलत असताना राज ठाकरे यांनी सध्याचं राजकारण अतिशय दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. "सध्याचं राज्यातील राजकारण खालच्या पातळीवर गेलं आहे. राजकीय नेत्यांची आरोप करतानाची भाषा अतिशय खालच्या पातळीवर गेली आहे आणि हे दुर्दैव आहे. अशी भाषा महाराष्ट्राच्या राजकारणात मी याआधी कधीच पाहिली नाही", असं राज ठाकरे म्हणाले.