"मी ठासून सांगतोय माघार घेणार नाही"; वर्षा बंगल्यावरील भेटीनंतर सरवणकरांची स्पष्ट भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 12:36 PM2024-11-01T12:36:24+5:302024-11-01T12:38:06+5:30

Sada Sarvankar : माहीम विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतून माघार घेणार नसल्याचे सदा सरवणकर यांनी ठामपणे सांगितले आहे.

Sada Saravankar firmly said that he will not withdraw from Mahim Assembly Constituency elections 2024 | "मी ठासून सांगतोय माघार घेणार नाही"; वर्षा बंगल्यावरील भेटीनंतर सरवणकरांची स्पष्ट भूमिका

"मी ठासून सांगतोय माघार घेणार नाही"; वर्षा बंगल्यावरील भेटीनंतर सरवणकरांची स्पष्ट भूमिका

Mahim Assembly Constituency :माहीम विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे सध्या संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेलं आहे. माहीम विधानसभा मतदारसंघातून मनसेने राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. अमित ठाकरे यांच्यासमोर शिंदे गटाच्या सदा सरवणकर आणि ठाकरे गटाच्या महेश सावंत यांचे आव्हान आहे. दुसरीकडे, महायुतीमधील घटक पक्षांनी अमित ठाकरे यांना समर्थन सरवणकर यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र सरवणकर हे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. कार्यकर्त्यांची इच्छा मोडता येणार नाही निवडणुकीला उभे राहावे लागेल आणि जिंकून सुद्धा यावं लागेल, असं सदा सरवणकर यांनी म्हटलं आहे.

पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या अमित ठाकरे यांची सोपी होण्यासाठी मनसेसह महायुतीकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. भाजपने उघडपणे अमित ठाकरे यांना समर्थन दिलं आहे. मात्र सदा सरवणकर यांनी पुन्हा एकदा आपण निवडणुकीतून माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे. दुसरीकडे, सदा सरवणकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गुरुवारी रात्री वर्षा बंगल्यावर भेटीसाठी बोलवल्याचे म्हटलं जात आहे. या भेटीत सरवणकर यांना विधान परिषदेवर पाठवण्याची ऑफर दिल्याचीही चर्चा आहे. मात्र आता सरवणकर यांनी या भेटीबाबतही खुलासा केला आहे.

"निवडणूक अर्ज मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही मला शिवसेनेकडून एबी फॉर्म मिळालेला आहे आणि मी निवडणूक अर्ज भरलेला आहे आणि मी निवडणूक लढवणार आहे. माझी कोणाशी चर्चा झाली नाही मी वर्षा बंगल्यावर गेलो हे सत्य आहे पण मुख्यमंत्र्यांसोबत भेट झाली हे असत्य आहे. मी तिथल्या कर्मचाऱ्यांसोबत बोललो गप्पागोष्टी केल्या. मुंबईतला जवळचा आमदार असल्याने वर्षात वर दिवसातून एक दोन वेळा जातो. गेल्यानंतर प्रत्येक वेळी मुख्यमंत्र्यांना भेटतो असं नाही," असं स्पष्टीकरण सदा सरवणकर यांनी दिलं.

"महायुतीचा धर्म आम्ही पाळणार आहोत हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. ज्यांचा एकच आमदार आहे त्यांनी मुख्यमंत्री कोण होईल हे सांगणे किती हास्यास्पद आहे. मुख्यमंत्री कोण होईल हे पुढे महायुती ठरवेल. मला एवढेच कळतं की मी माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभा राहिलेलो आहे आणि लोकांच्या आशीर्वादाने निवडून येणार आहे‌," असं सदा सरवणकर म्हणाले.

"मी ठासून ठामपणे सांगतोय की मी माघार घेणार नाही. मी निवडणूक लढवणार आणि जिंकून येणार. जनतेची आणि कार्यकर्त्यांची तशी इच्छा आहे. त्यामुळे मला कार्यकर्त्यांची इच्छा मोडता येणार नाही निवडणुकीला उभे राहावे लागेल आणि जिंकून सुद्धा यावं लागेल," असेही सदा सरवणकर म्हणाले.

Web Title: Sada Saravankar firmly said that he will not withdraw from Mahim Assembly Constituency elections 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.