अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 10:31 AM2024-10-27T10:31:07+5:302024-10-27T10:31:47+5:30

Mahim Assembly Constituency : माहीम विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या नेत्यांनी अमित ठाकरेंना पाठिंबा दिल्याने सदा सरवणकर यांचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.

Sada Saravankar supporter angry as Mahayuti leaders support Amit Thackeray in Mahim assembly constituency | अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."

अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."

Sada Sarvankar vs Amit Thackeray : माहीम विधानसभा मतदारसंघावरुन सध्या महायुतीमध्ये मतभेद सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने माहीम मतदारसंघातून अमित ठाकरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणूक लढवत असल्याने त्यांना विजयी करण्यासाठी मदत करावी असं भाजप नेत्यांचे म्हणणं आहे. तर दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाकडून या मतदारसंघात विद्यमान आमदार सदा सरवणकर हे पुन्हा निवडणूक लढवत आहेत. सदा सरवणकर यांनीही आपण माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केलं. मात्र भाजपच्या नेत्यांनी अमित ठाकरे यांना समर्थन देण्याचे विधान केल्यानंतर सरवणकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्याला पूर्ण आशीर्वाद दिला असल्याचे सदा सरवणकर यांनी म्हटलं.

माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेने विद्यमान आमदार सदा सरवणकर यांच्यात तगडी लढत होणार आहे. पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या अमित ठाकरेंना पाठिंबा द्यायला हवा असं मत महायुतीमधील काही नेत्यांनी मांडले आहे. त्यामुळे सदा सरवणकर यांना माघार घ्यायला लावली जाणार असल्याचा चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यामुळे शनिवारी सरवणकर यांच्या शाखेबाहेर  शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते जमले होते आणि त्यांनी निवडणुकीतून माघार न घेण्याची मागणी केली. महायुतीच्या नेत्यांनी अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याचा विचार मांडल्यानंतर सरवणकरांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. त्यानंतर संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांची सदा सरवणकर यांनी समजूत काढली.

"आपण सर्वजण मोठ्या संख्येनं आलात त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतोय. आपल्या येण्याचं कारणही मला कळलं आहे. मिडियामध्ये उमेदवारी मागे घेणार अशाप्रकारच्या बातम्या येत आहेत. मात्र या बातमीत किंचितही सत्यता नाही," असं स्पष्टीकरण सदा सरवणकर यांनी दिलं.

"राज्याचे मुख्यमंत्री आणि प्रमुख नेते एकनाथ शिंदेंनी आपल्याला पूर्ण आशीर्वाद दिलेला आहे. महायुतीच्या सर्वच नेत्यांनी आशीर्वाद दिलेला आहे. त्यांची इच्छा एकच आहे, माननीय शिवसेना प्रमुखांच्या विचाराचा उमेदवार हा इथून निवडून आला पाहिजे. आपण सर्वजण मागील अनेक वर्षांपासून शिवसेनाप्रमुखांचे आदेश पुढे घेऊन जात आहोत. एकनाथ शिंदेंही शिवसेनाप्रमुखांच्या विचार पुढे घेऊन जाण्याचं काम करत आहेत. म्हणून आपण निश्चिंत राहायला हरकत नाही," असं सदा सरवणकर म्हणाले.

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आपला पूर्ण विश्वास आहे. त्यांनीच एबी फॉर्म दिला. त्यांनी फॉर्म कधी भरायचं हे देखील सांगितलं. वाटेल त्या परिस्थितीमध्ये दादर, माहीम, प्रभादेवीमधला आपला उमेदवार निवडून आलाच पाहिजे  हे ही त्यांनी सांगितलं. त्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व करु. त्यांनी आशीर्वाद दिला आहे त्यामुळे ज्या काही अफवा पसरवल्या जात आहेत त्यांच्यावर विश्वास ठेऊ नका. निश्चिंत होऊन घरी जा. आपण सोमवारी सकाळी दहा वाजता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघणार आहोत त्यामुळे तयारीला लागा असेही सदा सरवणकर यांनी कार्यकर्त्यांना म्हटलं.

Web Title: Sada Saravankar supporter angry as Mahayuti leaders support Amit Thackeray in Mahim assembly constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.