सदा सरवणकर राज ठाकरेंना भेटणार! म्हणाले- "मी महायुतीचा उमेदवार, त्यांची भेट घेईन अन्..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2024 08:58 AM2024-11-03T08:58:13+5:302024-11-03T08:58:59+5:30

Sada Sarvankar Raj Thackeray: माहिम मतदारसंघातून सदा सरवणकर आणि अमित ठाकरे दोघांनीही अर्ज भरला असून उद्या अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे

Sada Sarvankar said he will try to meet MNS chief Raj Thackeray and request him to bless me too amid Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Amit Thackeray Mahim controversy | सदा सरवणकर राज ठाकरेंना भेटणार! म्हणाले- "मी महायुतीचा उमेदवार, त्यांची भेट घेईन अन्..."

सदा सरवणकर राज ठाकरेंना भेटणार! म्हणाले- "मी महायुतीचा उमेदवार, त्यांची भेट घेईन अन्..."

Sada Sarvankar Raj Thackeray, Amit Thackeray Mahim Vidhan Sabha Election 2024: राज्यभर विधानसभा निवडणुकीच्या चर्चा रंगल्या आहेत. मुंबईतील दादर माहिम मतदारसंघाकडे यंदा साऱ्यांचे विशेष लक्ष आहे. या मतदारसंघातून पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणूक लढवत आहेत. दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांनीही याच विभागातून अर्ज भरला आहे. सदा सरवणकर हे दोन-तीन वेळा निवडणून आल्याने त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. पण अमित ठाकरे यांच्या विरोधात सदा सरवणकर यांनी निवडणूक लढवू नये अशी भूमिका काहींनी घेतली आहे. सरवणकर यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु आहेत, पण ते मात्र निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. तशातच आज सदा सरवणकर यांनी राज ठाकरेंची भेट घेणार असल्याचे सांगितले आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

"मी महायुतीचा उमेदवार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांनीही मला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले आहेत. मी उमेदवारी अर्ज भरला असून प्रचारालाही सुरुवात केली आहे. मला माझ्या मतदारांवर पूर्णपणे विश्वास आहे. मी त्यांच्यासाठी गेली १५ वर्षे केलेल्या कामाची पावती मला नक्की मिळेल. माझे मतदार माझ्यावर खूप प्रेम करतात, ते मला नक्कीच जिंकवतील. महायुतीचा उमेदवार जिंकला पाहिजे आणि त्यासाठीच मी सर्वोत्तम प्रयत्न करत आहे. मी राज ठाकरेंना भेटण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यांनाही विनंती करणार आहे की त्यांनीही मला शुभेच्छा व आशीर्वाद द्यावेत," असे सदा सरवणकर म्हणाले.

सरवणकर-अमित ठाकरे वादावर एकनाथ शिंदेंचे मत काय?

"लोकसभा निवडणुकीच्या वेळा आम्ही एकत्र होतो. माझी राज ठाकरेंशी चर्चादेखील झाली होती. मी त्यांना तेव्हाच विचारलं होतं की विधानसभेसाठी तुमची रणनीती काय असेल? त्यावेळी ते मला म्हणाले होते की, शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी महायुतीची चर्चा होऊ दे. त्यानंतर आपण बोलूया, पण त्यांनी थेट उमेदवार देण्यास सुरुवात केली. (माहिममध्ये जेथून अमित ठाकरे लढणार आहेत,) तेथून आमचाही आमदार दोन-तीन टर्मपासून जिंकत आला आहे. सदा सरवणकर हे आमचे जुने सहकारी आणि कार्यकर्ता आहेत. ते आमचे आमदार आहेत. मी त्यांच्याशीही चर्चा केली. त्यांचे कार्यकर्ते निवडणूक लढवण्याबाबत खूपच आक्रमक आहेत. आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांचीही काळजी घ्यावी लागते. कार्यकर्त्यांचे मनोबल खचू नये हे देखील नेत्यांचे काम असते," असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच व्यक्त केले आहे.

Web Title: Sada Sarvankar said he will try to meet MNS chief Raj Thackeray and request him to bless me too amid Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Amit Thackeray Mahim controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.