Amit Thackeray Sada Sarvankar, Mahim Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे. त्यातही दादर माहिम मतदारसंघाबाबत विशेष चर्चा सुरु आहे. कारण या मतदारसंघातून पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे आपले नशीब आजमावणार आहेत. या मतदारसंघातून अमित ठाकरे यांनी आजच उमेदवारी अर्ज भरला. या मतदारसंघात ठाकरे गटाने महेश सावंत तर शिंदे गटाने सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे. सदा सरवणकर हे सध्याचे आमदार असून त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. महायुती आणि मनसे यांच्यात सामंजस्य होऊन सदा सरवणकर यावेळी माघार घेतील अशी चर्चा होती. पण ते निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचे त्यांनीच सांगितले. यावेळी त्यांनी अमित ठाकरे यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली. (Maharashtra Assembly Election 2024)
"अमित ठाकरे म्हणतात की मी चालत फिरतो, लोकांच्या अडचणी मला माहिती आहेत आणि माझा विजय निश्चित आहे, यावर आपलं मत काय," असा प्रश्न पत्रकाराने सदा सरवणकरांना विचारला. त्यावर एबीपीमाझावर बोलताना त्यांनी खोचक शब्दात उत्तर दिले.
काय म्हणाले सदा सरवणकर?
"मी चालत फिरतो या शब्दांचा अर्थ असा असेल की, कधीच न चालणारा माणूस कधीतरी म्हणतो की मी चालतो. पण आम्ही जमिनीवरची लोकं आहोत. आमची जमिनीशी नाळ जुळलेली आहे. आम्ही ३६५ दिवस काम करतो. या मतदारांसाठी एक तास किंवा एक दिवस काम करणे महत्त्वाचे आहे, ३६५ दिवस काम करायला हवे. मी रोज या जनतेसाठी काम करतो आहे," असे सदा सरवणकर म्हणाले.
"माहिममधील लढतीबाबत शिवसेनेमध्ये चर्चा नाही, तर विरोधी मंडळींमध्ये चर्चा सुरू आहे. मी उद्या १० वाजता उमेदवारी अर्ज भरणार आहे. त्यामुळे निवडणूक लढवण्याबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. तसेच शिवसेनाप्रमुखांचे विचार पुढे घेऊन जाणं, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दादर माहिममधील जनतेला, मतदारांना न्याय देणं ही आजची काळाची गरज आहे. ३६५ दिवस आम्ही या मतदारसंघामध्ये काम करतो. सर्वसामान्यांमधील उमेदवार म्हणूल लोक माझ्याकडे बघतात. त्यामुळे इतर कुठल्याही चर्चेकडे दुर्लक्ष करा. मी उद्या सकाळी उमेदवारी अर्ज भरणार आहे," असे त्यांनी ठणकावून सांगितले.