मुंबई - राज्य सरकारनं ST कर्मचाऱ्यांना दिलेली वेतनवाढ व इतर मागण्यांवर घेतलेली भूमिका स्वागतार्ह असल्याचं म्हणत आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी केली. त्यानंतर, आमदार खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी या आंदोलनातून तात्पुरती माघार घेतल्याचं जाहीर करत, आझाद मैदान सोडलं. त्यानंतर, आंदोलक कामगारांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आंदोलकांचं नेतृत्व करताना पडळकर व खोत यांच्यावर टीका केली आहे.
आपण संघटनेतील कामगारांचे पैसे गोळा केले, त्यातून 3 कोटी रुपये जमा केल्याचा आरोप तुमच्यावर होत असल्यासंदर्भात वकील गुणरत्न सदावर्तेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना सदावर्ते यांनी आमदार पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यावर जोरदार प्रहार केला.
'मी एक रुपयाही कोणाकडून घेतला नाही, मी संघटना म्हणून नाही. सदाभाऊ तुम्ही पाया पडलेले व्हिडिओ माझ्याकडे आहेत, ती रेकॉर्डींग जर मी सांगितली. तुम्ही म्हणालात, दोन लेकरांची शपथ घेतो. पण, सदाभाऊ आणि गोपीचंद पडळकर तुम्ही माझ्या घरी दोनदा आला होतात. विश्वास नांगरे पाटलांची भीती वाटत होती म्हणून आलात. हे पराभूत मानसिकतेतून काहीही बोललं जात आहे,' असे सदावर्ते म्हणाले.
माझ्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहेत, माझ्याकडे ऑडिओ रेकॉर्डींग आहे, सदाभाऊ तुम्ही वयोवृद्ध आहेत, म्हणून बोलत नाही. पण, 10 किमीवरील ओबीसींसाठीची शाळा, सांगू काय लोकांना, शाळेवर हे प्रकरण सदाभाऊंना घेऊन गेलं हे मी डंके की चोटवर सांगतो, असे म्हणत सदावर्तेंनी पडळकर आणि खोत यांच्यावर टीका केली आहे. शरद पवारांचं हे तोडो पॉलिटीक्स आहे, कामगार मध्येच बैठकीतून निघून गेले होते. पण, या दोघांनी... असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं.
तसेच, माझी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही काल चर्चा झाली होती, आज खोत आणि पडळकर गेले नाहीत. तर, आम्हीच त्यांना आझाद मैदानातून आझाद केलंय, असेही सदावर्तेंनी म्हटलं. मी ओबीसींची शाळा कधी घेतली नाही, मी सर्वाधिक क्लाईंट असलेला वकील आहे. सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांना माहितीय, मी इकडून तिकडे उड्या मारणार नाही. त्यामुळे, मी नॉन पॉलिटीकल माणूस आहे. त्यामुळेच, बड्या नेत्यांविरुद्ध बोलू शकतो, असेही सदावर्तेंनी म्हटलं.