सदाभाऊ खोत अन् राजू शेट्टींना कोरोना, टेन्शन आलं संपर्कातील कार्यकर्त्यांना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2020 03:52 PM2020-09-06T15:52:06+5:302020-09-06T15:52:57+5:30
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून अनेक परिचित व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून येत आहे. सांगली जिल्ह्यात तब्बल 7 आमदारांना कोरोना झाला असून अनेक दिग्गज नेत्यांनाही लागण झाली आहे.
मुंबई - स्वाभीमान शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, माजी मंत्री आणि रयत संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. राजू शेट्टींनी दोन दिवसांपूर्वी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन माहिती देताना, माझी कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्याचे म्हटले होते. मात्र, डॉक्टरांच्या सांगण्यावरुन मी स्वत:ला क्वारंटाईन करत असल्याचेही ते म्हणाले. माझ्या फुफ्फुसावरुन कोरोनाचे लक्षणं असल्याचं समजते, असे डॉक्टरांनी सांगितल्याचं शेट्टी यांनी म्हटले आहे.
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून अनेक परिचित व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून येत आहे. सांगली जिल्ह्यात तब्बल 7 आमदारांना कोरोना झाला असून अनेक दिग्गज नेत्यांनाही लागण झाली आहे. यापूर्वीही राज्य मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यांनी कोरोनावर मात करुन ते ठणठणीत बरे झाले आहेत. आता, सांगली जिल्ह्यात आमदार सुमनताई पवार यांच्यासह त्यांच्या मुलालाही कोरोनाची बाधा झाली आहे. तर, शेतकरी नेते राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनाही लागण झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याने कार्यकर्त्यांना टेन्शन आले असून नेत्यांनी विलगीकरणाचा सल्ला संपर्कातील कार्यकर्त्यांना दिलाय.
जिल्ह्यातील सात आमदार, तीन माजी आमदार, एक माजी खासदार असे डझनभर नेते कोरोनाबाधित झाले आहेत. त्यामुळे सर्वपक्षीय सक्रीय कार्यकर्ते कोरोना संसर्गाबाबत अधिक काळजी घेऊ लागले आहेत. जिल्ह्यात आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, आ. अनिल बाबर, आ. विक्रम सावंत, आ. मोहनराव कदम, आ. सदाभाऊ खोत, आ. सुमनताई पाटील हे सात आमदार कोरोनाबाधित झाले आहेत. याशिवाय माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार संभाजी पवार, नितीन शिंदे, राजेंद्रअण्णा देशमुख, कॉंग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर. आर. पाटील हेसुद्धा बाधित झाले आहेत. त्यामुळे राजकीय क्षेत्राला कोरोनाने कवेत घेतल्याचे चित्र दिसत आहे.
नेते मंडळींचे अनेक कार्यकर्तेही पॉझिटिव्ह येत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सांगलीत कोरोनाच्या संकटकाळात मास्क, सॅनिटायझर, औषध वाटप करण्यासाठी राजकीय नेते व कार्यकर्ते काम करीत आहेत. पक्षांच्या बैठका, आंदोलने, शासकीय नियोजन बैठका यांना ते उपस्थितही रहात होते. या कार्यामुळे नागरिकांना दिलासा देण्याचे काम ते करीत असताना त्यांना कोरोनाची बाधा झाली. या नेत्यांबरोबर काही कार्यकर्तेही बाधित झाले असल्याने राजकीय क्षेत्र सध्या क्वारंटाईन झाल्याच्या स्थितीत आहे