...मग ज्यांचे प्राण गेले ते चुकीचे होते का? सदाभाऊ खोत यांचा राजू शेट्टींवर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 08:25 PM2020-06-16T20:25:10+5:302020-06-16T20:26:53+5:30
राजू शेट्टी आणि शरद पवार भेटींवर माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जोरदार प्रहार केला आहे.
मुंबई – राज्यात आगामी काळात होणाऱ्या विधान परिषद निवडीवरुन राजकारणाला वेग आला आहे. राज्यपाल नियुक्त १२ जागांवर सत्ताधारी पक्षाकडून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना नावं सुचवली जाणार आहेत. यामध्ये राष्ट्रवादीच्या कोट्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना विधान परिषदेवर घेण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी बारामतीला जाऊन शरद पवारांची भेट घेतली.
राजू शेट्टी आणि शरद पवार भेटींवर माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जोरदार प्रहार केला आहे. यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले की, राजू शेट्टी यांना विधान परिषदेवर घेण्याचा महाविकास आघाडीचा अंतर्गत प्रश्न आहे. राजू शेट्टी शेतकरी चळवळीतून आलेले आहेत ते आमदार होत असतील तर त्याचा आनंद आहे. पण दु:ख एका गोष्टीचं आहे की, ज्या पांडुरंगाला साकडं घालून बारामतीच्या दिशेने आम्ही चालत गेलो, अनेकांच्या पायाला फोड आले, आंदोलनात लाठ्याकाठ्या खाल्ल्या. दोन जणांनी प्राण गमावले ते चुकीचे होते का? तुरुंगात गेले ही माणसं कशासाठी झटली हा प्रश्न आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच गेल्या ३ महिन्यात १२०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, कापूस खरेदी झाली नाही, कोकणात शेतकऱ्यांच्या बागा उद्ध्वस्त झाल्या त्यावर राजू शेट्टी यांनी आवाज उठवला नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ते बारामतीला गेले असते तर त्याचा जास्त आनंद झाला असता. पण राजू शेट्टी शेतकऱ्यांपासून लांब गेले आहेत, त्यांना शेतकऱ्यांची गरज उरली नाही. जे शेतकरी यांच्यासाठी लढले त्यांचा विश्वासघात झाला आहे. शेतकऱ्यांची पर्वा त्यांना राहिली नाही अशी घणाघाती आरोप सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर केला आहे.
दरम्यान, राजू शेट्टी यांच्या दृष्टीने आमदारकी आणि खासदारकी महत्त्वाची आहे. गेल्या सरकारमध्ये त्यांनी अनेक आंदोलनं केली, पण या सरकारमध्ये राजू शेट्टी यांनी एकदाही शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले नाही. कोरोना संकटात शेतकरी उद्ध्वस्त झाला, तेव्हा आवाज उठवला नाही. पण एका आमदारकीसाठी त्यांना बारामतीला जावं लागलं असा टोलाही खोत यांनी राजू शेट्टी यांना लगावला आहे.