मुंबई - भाजप पुरस्कृत आमदार आणि रयत शेतकरी संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी जागर शेतकऱ्यांचा आणि आक्रोश महाराष्ट्राचा नावाने यात्रा सुरू केली आहे. नाशिकनंतर आता त्यांचं हे अभियान चाळीसगांवला पोहोचलं आहे. शेतकऱ्यांच्या समस्या, अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा राज्यव्यापी दौरा असल्याचं म्हणत या दौऱ्यात महाविकास आघाडीवर सदाभाऊ जोरदार टिका करत आहेत. आता, त्यांनी ट्विट करुन शिवसेनेवर टिका केली आहे.
शिवसेना आणि भाजपची गेल्या 25 वर्षांपासूनची युती होती. मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकानंतर भाजप आणि शिवसेनेची युती तुटली. त्यानंतर, राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात आलं. महाविकास आघाडीचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली. मात्र, ते मुख्यमंत्री झाल्यापासून भाजकडून सातत्याने शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सध्या नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या आंदोलनावरुन शिवसेनेला भाजपकडून टार्गेट करण्यात येत आहे. त्यात, सदाभाऊ खोत हेही भाजपची भूमिका मांडत शिवसेनेवर टिका करत आहेत.
सदाभाऊंकडून महागाईचं समर्थन
सदाभाऊ खोत यांनी सोमवारी चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आघाडी सरकारचे धोरणांसह पवार कुटुंबीयांवार जोरदार टीका केली. तसेच, महगाईवरही भाष्य केलं होतं. कशाची महागाई आली हो, 20 हजाराचे सोनं 50 हजार तोळा झालं तरी लोक घेतात ना? तेव्हा महागाई दिसत नाही, देशी क्वार्टर आता 150 ते 200 रुपयांना मिळायला लागली आहे. मग, महागाई नाही वाढली का? महागाई झाली तरी लोकं दारू पिणं सोडता का? कांदा डाळींच्या किंमती वाढल्यास शेतकरी सुखी होईल, असे सदाभाऊंनी म्हटलं होतं.