मुंबई: अलीकडेच महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत किराणा दुकानासह सुपरमार्केटमध्ये वाईन विकण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली. मात्र, यानंतर विरोधकांनी ठाकरे सरकारच्या या निर्णयाला जोरदार विरोध करत निशाणा साधला आहे. भाजप, मनसे, एमआयएमनंतर आता शेतकरी नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनीही ठाकरे सरकारवर टीका केली आहे. डेअरी बंद करून वायनरी काढा, या शब्दांत सदाभाऊ खोत यांनी टीकास्त्र सोडले आहे.
मंदिरात पाणी, तीर्थाऐवजी वाईनच द्या. महाविकास आघाडी ही मद्यविक्री विकास आघाडी आहे. शेतकऱ्यांच्या नावावर दुकानदारी खपवण्यासाठी वाईनचा निर्णय घेतला गेला, गावातल्या डेअरी बंद करा आणि मंत्रालयातच वायनरी काढा, असा टोलाही सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे. राज्य सरकारने साखर कारखान्यांमधील अंतराची अट काढून टाकावी, मग आम्ही समजेल की तुम्ही शेतकऱ्यांसाठी निर्णय घेत आहे, असेही सदाभाऊ खोत म्हणाले.
कामगारांच्या मनात धास्ती आहे
एसटी मधला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार संपायला तयार नाही. कामगारांच्या मनात धास्ती आहे, लालपरी वाचणार नाही, असेही खोत यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, राज्यातील व्यापाऱ्यांसह अन्य अनेक घटकांतून या निर्णयाला जोरदार विरोध होत आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही या निर्णयाला विरोध दर्शवला. संभाजी भिडे या निर्णयावर टीका करताना, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी हे ठाकरे सरकार बरखास्त करावे, अशी थेट मागणी केली. भाजप नेत्यांनी तर महाराष्ट्राला मद्यराष्ट्र्र बनवण्याचा हा डाव असल्याचा आरोप केला.
दरम्यान, वाईन विक्रीतून मिळणारा महसूल वाढविण्याच्या दृष्टीकोनातून राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून, आता राज्यात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. वाईन विक्रीच्या नव्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. जे सुपर मार्केट १ हजार स्वेअर फुटांच्यावर आहेत तिथे एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला सरकारने मुभा दिली आहे.