Sadabhau Khot News: विधान परिषदेच्या ११ पैकी ९ जागा जिंकून भाजप-शिंदेसेना-अजित पवार गट या महायुतीने दणदणीत विजय मिळवत महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला. महाविकास आघाडीचेशरद पवार गट समर्थित उमेदवार शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला. यानंतर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. महाविकास आघाडीची मते फुटल्यावरून महायुतीच्या नेत्यांनी निशाणा साधला. यातच आता शरद पवार यांनी टाकलेल्या डावात जयंत पाटील यांचा बळी गेला, असे सांगत विधान परिषदेत निवडून आलेले आमदार सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका केली.
विधान परिषदेत विजय मिळाल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी मुंबईतील सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यानंतर पत्रकारांशी बोलताना सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. शेतकऱ्यांचे शिवार हिरवेगार होऊ दे. त्याच्या खळ्यावरती धन धान्याची रास लागू दे. धान्याला भाव मिळू दे, अशी मागणी बाप्पाच्या चरणी केली. गावगाड्यात राबणाऱ्या माणसाने मला वाढवले. तळहातावरील फोडाप्रमाणे जपले. देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यासारख्या फाटक्या माणसाला महाराष्ट्राच्या वरिष्ठ सभागृहात काम करण्याची संधी दिली. देवेंद्रजींना बाप्पाने उदंड आयुष्य द्यावे, असे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.
शरद पवारांनी टाकलेल्या डावात जयंत पाटलांचा बळी गेला
महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार आहेत. ते म्हणतात, महाराष्ट्राचे सत्ता परिवर्तन करु शकतो. कोणाचीही सत्ता आणू शकतो. कोणाचीही सत्ता घालवू शकतो. शिवसेना भाजपाचे सरकार सत्तेत आले होते. तेव्हा शरद पवारांनी फोडाफोडी केली. स्वत:कडे सत्ता येत असेल तर वाटेल ते करण्याची पवारांची तयारी असते. या राज्यातील शेतकरी कामगार पक्ष संपवण्याचे काम शरद पवारांनी केले. मुख्यमंत्री करताना उद्धव ठाकरे तुमचे ऐकतात. भाजपाची साथ सोडताना उद्धव ठाकरे तुमचे ऐकतात, मग जयंत पाटील यांच्या साध्या उमेदवारीसाठी त्यांनी का ऐकले नाही. हा पवारांनी टाकलेला डाव होता. या डावामध्ये जयंत पाटलांचा बळी गेला. शरद पवारा यांनी जयंत पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला, या शब्दांत सदाभाऊ खोत यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, गावगाड्याच्या चर्चा नेहमी होत असतात. फाटक्या माणसांच्या होतात. वाड्यातील माणसांच्या चर्चा होत नाहीत. कारण ते जन्माला येतानाच ताम्रपट घेऊन आलेले असतात. कोणतेही सिंहासन हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क असतो. परंतु भारतीय जनता पक्षाने आणि देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की, प्रस्थापितांचा सिंहासनावर हक्क नाही, तर कष्ट करणाऱ्या जनतेचा सिंहासनावर हक्क आहे. मला वाटते की, प्रस्थापितांचे मनसुबे धुळीला मिळाले आहेत. हे विधान परिषद निकालावरुन स्पष्ट झाले, असे सदाभाऊ खोत म्हणाले.