Join us

“भाजपा सर्वसामान्य बहुजनांचा पक्ष”; विधान परिषद उमेदवारीवर सदाभाऊ खोतांची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2024 4:35 PM

Sadabhau Khot News: सामान्य कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने एक मोठी संधी भाजपाने दिली, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.

Sadabhau Khot News: महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. अलीकडील लोकसभा निवडणुकीत निसटता पराभव झालेल्या पंकजा मुंडे यांच्यासह एकूण पाच जणांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. पंकजा मुंडे यांच्यासह परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना भाजपानं उमेदवारी दिली आहे. विधान परिषेदची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी पहिली प्रतिक्रिया देताना भाजपा सर्वसामान्य बहुजनांचा पक्ष असल्याचे म्हटले आहे. 

सदाभाऊ खोत म्हणाले की, राज्यातील शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार यांना ही उमेदवारी समर्पित करतो. भाजपा सर्व घटकांना घेऊन जाणारा पक्ष आहे. १८ पगड जातींना एकत्र ठेवण्याचे काम खऱ्या अर्थाने भाजपाने केले आहे. माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातील, शेतकरी चळवळीतील, सामान्य कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने एक मोठी संधी भाजपाने दिली. याबद्दल निश्चित ऋणी राहीन, असे सदाभाऊ खोत यांनी नमूद केले. 

भाजपा सर्वसामान्य बहुजनांचा पक्ष

सर्वसामान्य बहुजनांचा पक्ष म्हणून भाजपाकडे बघावे लागेल. या पक्षाने रामदास आठवले, माधव जानकर, गोपीचंद पडळकर, पंकजा मुंडे या सर्व घटकांना, तळातल्या माणसांना वर घेऊन जाण्याचे काम सुरुवातीपासून केले. तसेच निश्चित सर्वसामान्यांची बाजू घेऊन लढणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे काम हे भाजपाने केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानतो. त्यांनी मला ही उमेदवारी घोषित केली आहे, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. ते टीव्ही९ शी बोलत होते.

दरम्यान, सध्याचे विधान परिषदेतील पक्षीय बलाबल पाहायचे झाल्यास भाजपाचे १०३ आमदार आहेत. तर भाजपाचे महायुतीमधील मित्र पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे ३७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ३९ आमदार आहेत. त्याशिवाय इतर छोटे पक्ष ९ आणि अपक्ष १३ असे एकूण २०१ आमदारांचे पाठबळ महायुतीकडे आहे. सध्याच्या गणितानुसार विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे ९ तर महाविकास आघाडीचे २ आमदार निवडून येऊ शकतात. मात्र एखादा अतिरिक्त उमेदवार रिंगणात उतरल्यास ही निवडणूक रंगतदार होऊ शकते.   

टॅग्स :विधान परिषद निवडणूक 2024सदाभाउ खोत भाजपा