“येणारे येतीलच, पण पंतप्रधानपदाची खुर्ची तुमच्या नशिबी नाही हे नक्की”; सदाभाऊंचे पवारांना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 12:11 PM2022-03-08T12:11:42+5:302022-03-08T12:12:18+5:30
शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेचा सदाभाऊ खोत यांनी समाचार घेतला.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी (Sharad Pawar) पक्षाच्या मेळाव्यानिमित्त केलेल्या भाषणात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधत 'मी पुन्हा येईन' या वक्तव्यावरुन टोले लगावले. यानंतर भाजप नेत्यांनी शरद पवार यांच्यावर पलटवार केला. यातच माजी कृषी राज्यमंत्री व रयत क्रांती संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून शरद पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे.
संकट काळात राजकारण करायचे नसते. काही लोकांना ते जमत नाही. ते कुठेही राजकारण करतात. निवडणूक लागायच्या आधीच, निकाल लागायच्या आधीच मी पुन्हा येईन असे सांगत फिरत होते. पण आम्ही येऊ देतो का, अशी खोचक विचारणा करत शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या जखमेवर मीठ चोळले. तुम्ही पुन्हा येणार नाही याची पूर्ण खबरदारी आम्ही घेतलेली आहे. ही आघाडी आता यशस्वी झाली आहे आणि उद्धव ठाकरे चांगले काम करत आहेत. सत्तेसाठी नाही, तर महाराष्ट्रातील जनतेसाठी ही आघाडी काम करत आहे, असे शरद पवार म्हणाले होते. यानंतर सदाभाऊ खोत यांनी ट्विटरच्या माध्यमातून शरद पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे.
पंतप्रधानपदाची खुर्ची तुमच्या नशिबी नाही हे नक्की
येणारे येतीलच पण पंतप्रधान पदाची खुर्ची आपल्या नशिबी येणार नाही हे मात्र नक्की, असे ट्विट सदाभाऊ खोत यांनी केले आहे. दुसरीकडे, भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनीही शरद पवार यांच्यावर पलटवार केला आहे. अतुल भातखळकर यांनी एक ट्विट केले असून, पवारसाहेब ज्याचा हात घट्ट धरतात..... त्याची हमखास विकेट जाते, हा इतिहास आहे, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
दरम्यान, नवाब मलिक यांना मंत्रिमंडळातून काढा असा आग्रह भाजप करतेय. परंतु त्यांना अटक झाली म्हणून का काढा? कबूल आहे त्यांना अटक झाली परंतु सिंधुदुर्गातील एक जुने सहकारी नारायण राणे यांनाही अटक झाली होती. त्यांना अटक झाल्यानंतर मंत्रिमंडळातून कमी करण्याचा निर्णय कुणी घेतला हे पाहण्यात किंवा वाचण्यात आले नाही. एक न्याय नारायण राणे यांना लावता आणि दुसरा न्याय नवाब मलिक यांना लावता याचा अर्थ हे सगळे राजकीय हेतूने केले जात आहे, असे ते म्हणाले होते.