मुंबई/सोलापूर- राष्ट्रवादीला सांगतो बदमाश गुन्हेगाराला माझ्या अंगावर घालून कुभांड रचून आयुष्यातून उठविण्याचा प्रयत्न करत असाल तर हे यशस्वी होणार नाही. निश्चितपणे रयत क्रांती संघटना याचा मुकाबला करेल, असे म्हणत माजी मंत्री शेतकरी सदाभाऊ खोत यांनी हॉटेलचालकाचे आरोप फेटाळत राष्ट्रवादीला लक्ष्य केलं होतं. त्यानंतर, आज पत्रकार परिषद घेऊन सदाभाऊ खोत यांनी हॉटेलचालक अशोक शिनगारे हा राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता असल्याचे पुरावे सादर केले आहेत.
एका हॉटेल मालकानं थकलेल्या बिलावरून सदाभाऊ खोत यांना रस्त्यात गाठलं. सांगोला दौऱ्यावर असताना खोत गाडीतून उतरल्यानंतर अशोक शिनगारे नावाच्या हॉटेल व्यावसायिकाने त्यांना थकीत बिलाची रक्कम मागितली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता गदारोळ माजला होता. त्यानंतर, राष्ट्रवादी विरुद्ध सदाभाऊ खोत असं सामनाही रंगला आहे. आता, खोत यांनी अशोक शिनगारे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देत तो राष्ट्रवादीच कार्यकर्ता असल्याचे पुरावे दिले आहेत.
हॉटेलवाला अशोक शिनगारे हा राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता असल्याचा दावा करत सदाभाऊ खोत यांनी शिनगारे यांचे राष्ट्रवादी कार्यालयातील फोटो दाखवले. राष्ट्रवादीच्या कार्यालयात राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दिपक साळुंके यांच्यासमेवत शिनगारे यांचा फोटो दिसून येत आहे. तर, जयंत पाटील यांच्या स्वागतासाठी बनविण्यात आलेल्या पॉम्प्लेटवरही अशोक शिनगारे यांचा नेते म्हणून फोटो असल्याचाही पुरावा सदाभाऊ खोत यांनी दिला.
15 एप्रिल 2014 ते 6 मे 2014 या कालावधी आपल्या हॉटेलमध्ये सदाभाऊ यांच्या मुलाच्या सांगण्यावरुन आपण जेवणावळ घातल्याचं शिनगारे यांनी म्हटलं. पण, त्यावेळी 15 एप्रिल रोजी सगळा प्रचार संपला आणि 17 एप्रिल रोजी मतदान झालं होतं. तरीही, हा बहाद्दर निवडणूक झाल्यानंतर 25 दिवस आपल्या हॉटेलमध्ये कसं काय जेवण घालत होता? असा प्रश्न सदाभाऊ खोत यांनी विचारला आहे. निवडणूक झाल्यानंतर कुठला लोकप्रतिनिधी अशारितीने जेऊ घालतो, असेही सदाभाऊंनी म्हटले.
राष्ट्रवादीकडून माझ्यावर दोनवेळा हल्ल्याचा प्रयत्न
साोलापूर दौऱ्यावर असताना हॉटेल चालकाला मधी घालून माझ्यावर खुनी हल्ला करण्याचा राष्ट्रवादीच्या नेत्याचा प्लॅन होता. पण तो प्लॅन यशस्वी झाला नाही. मी मंत्री असताना माझ्यावर राष्ट्रवादीकडून हल्ल्याचा प्रयत्न झाला. तसेच, मी सोलापूर दौऱ्यावर गेस्ट हाऊसमध्ये असतानाही माझ्यावर हल्ला करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू होते, असेही सदाभाऊ खोत यांनी सांगितले.