दूध दरासाठी सदाभाऊ खोत यांचे मंत्रालयासमोर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:06 AM2021-06-11T04:06:01+5:302021-06-11T04:06:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनामुळे शेतकरी हवालदिल झालेला असतानाच आता दुधाचे दर कमी झाल्यामुळे रयत क्रांती संघटनेने गुरुवारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनामुळे शेतकरी हवालदिल झालेला असतानाच आता दुधाचे दर कमी झाल्यामुळे रयत क्रांती संघटनेने गुरुवारी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला होता. संघटनेचे अध्यक्ष, आमदार सदाभाऊ खोत यांनी मंत्रालयासमोर दूध उत्पादक शेतकरी व कार्यकर्त्यांसह दूध दरवाढीसाठी आंदोलन केले. या वेळी पोलिसांनी खोत यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
यासंदर्भात सदाभाऊ खोत म्हणाले की, राज्यात अनेक ठिकाणी गाईच्या दुधाला १८ ते २० रुपयांपर्यंत प्रतिलीटर भाव मिळत आहे. राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार ३/५ फॅट व ८/५ एसएनएफनुसार किमान २५ रुपये प्रतिलीटर दर देणे आवश्यक आहे. परंतु या आदेशाला सहकारी व खासगी दूध संस्थांकडून केराची टोपली दाखवण्यात येत आहे. दुधाला कमी भाव देणाऱ्या दूध संस्था व खासगी कंपन्यांवर कोणतीही कारवाई दुग्ध विकास विभागाकडून केली जात नाही. उलट अशा पद्धतीने कारवाई करण्याचा अधिकारच नसल्याचे सांगण्यात येत आहे.
ज्याप्रमाणे ऊस उत्पादक आणि साखर कारखाने यांच्यामध्ये ऊसासाठी किमान आधारभूत किंमत आणि एफआरपी आहे, त्याच धर्तीवर दुधालाही एफआरपी किंवा एमएसपी मिळावी. महाराष्ट्रातील दूध उत्पादकांना समान भाव देणे गरजेचे आहे. उसासाठी रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार ७०/३० चा फाॅर्म्युला आहे. त्याप्रमाणे दूध उत्पादकांसाठी किमान ८५/१५ चा फाॅर्म्युला करणे गरजेचे आहे. सध्या कोल्हापूरमधील गोकूळ दूध संघामध्ये ८१/१९ चा फॉर्म्युला कार्यरत आहे. १९६६-६७ नंतर संकरीकरणाचा तंत्रज्ञानयुक्त वापर दिसत नाही. गिर, धारपारकर या गाईंचे ब्रीड जागतिक आदर्शवत आहेत. या जातींच्या गाईंचे संगोपन होणे गरजेचे आहे. दुधाला भाव नसल्यामुळे महाराष्ट्रात अनेक दूध उत्पादकांनी आत्महत्या केल्या आहेत. किमान राज्य सरकारने जाहीर केलेल्या दराप्रमाणे दूध उत्पादकांना भाव मिळावे, अशी मागणी खोत यांनी केली.
.........................................