मुंबई - शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात आणि सत्ताकारणात मोठा भूकंप झाला आहे. शिंदेंच्या ट्विस्टमुळे राजकीय घडामोडींना वेग आला असून आता विधानसभेत बहुमत चाचणी होणार आहे. त्यासाठी, राज्यपालांनी मु्ख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून उद्याच सकाळी 11 वाजता बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. तत्पूर्वी आज कॅबिनेटी बैठक होणार असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील ठाकरे सरकार आता पडणार अशी चर्चा रंगत असताना भाजप नेते शिवसेनेवर टिका करत आहेत.
भाजप गटाचे समर्थक नेते आणि रयत शेतकरी संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी ट्विट करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये शिवसेना ही राष्ट्रवादी सेना कधी झाली, हे बाप लेकाला कळलेच नाही, अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी ठाकरे पिता-पुत्रांवर निशाणा साधला आहे. तर, दुसरीकडे फडणवीसांचे खास मानले जाणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांनी देवेंद्र फडणवीसांसाठी मुंबईतील सिद्धीविनायक गणरायाला साकडं घातलं आहे. त्यांनी ट्विटरवरुन व्हिडिओही शेअर केला आहे.
आपण शिवसेनेचे ३९ आमदार आणि ११-१२ अपक्ष आमदार असे मिळून त्यांना आपण पुरे आहोत. त्यांनी वर्षा सोडली, आमदार सोडले, पण शरद पवारांना काही सोडायला तयार नाहीत, अशी टीका गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता केली. आम्ही त्यांच्यासाठी काहीच केलं नाहीय का?, आम्हाला त्यांच्या आशीर्वादामुळे सर्व काही मिळालं, पण त्यात आमचाही काहीतरी त्याग आहे, असंही गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले. तसेच गुलाबराव पाटलांना आम्ही पानटपरीवर बसवू, असं संजय राऊत म्हणाले. मात्र त्यांना पानटपरीवर चुना कधी लावून जाईल हे त्यांना कळणार नाही, अशी टीका गुलाबराव पाटलांनी केली.