Join us  

सदानंद कदम यांनी कोर्टाची मागितली माफी; साई रिसॉर्टचे 'ते' बांधकाम पाडण्याची हमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 1:35 PM

न्यायालयाने त्यांचे म्हणणे मान्य करत बांधकाम पाडण्यासाठी आणखी १० दिवसांची मुदत देत पुढील सुनावणी ११ जून रोजी ठेवली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांनी दापोली येथील साई रिसॉर्टचा अनधिकृत भाग पाडण्याच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल शुक्रवारी उच्च न्यायालयाची माफी मागितली. येत्या १० दिवसांत रिसॉर्टचा अनधिकृत भाग पाडू, असे आश्वासनही त्यांनी दिले.

न्या. माधव जामदार यांच्या एकलपीठाने १८ मार्च रोजी कदम यांना १५ एप्रिलपर्यंत रिसॉर्टचे अनधिकृत बांधकाम हटविण्याचे आदेश दिले. तसेच कदम यांनी दिलेल्या हमीचे पालन केले नाही तर, त्यांच्यावर अवमानाची कारवाई करण्यात येईल, असेही न्यायालयाने बजावले होते. काही अडचणींमुळे साई रिसॉर्टचा दुसरा मजला पाडण्यास विलंब होत आहे, असे कदम यांचे वकील साकेत मोने यांनी न्यायालयाला सांगितले.

न्यायालयात उपस्थित असलेल्या कदम यांनी रिसॉर्टचा अनधिकृत भाग पाडण्याचा खर्च आपणच करू, असे सांगत न्यायालयाची माफी मागितली. न्यायालयाने त्यांचे म्हणणे मान्य करत बांधकाम पाडण्यासाठी आणखी १० दिवसांची मुदत देत पुढील सुनावणी ११ जून रोजी ठेवली आहे.

काय आहे प्रकरण?

भूखंडाच्या आधीच्या मालकाला तळमजला व पहिला मजला बांधण्याची परवानगी दिली होती. तरीही कदम यांनी दुसरा मजला उभारला. त्याशिवाय ज्या भूखंडावर रिसॉर्ट आहे, तो संपूर्ण भाग कोस्टल रेग्युलेशन -३ च्या क्षेत्रात येतो. त्यामुळे हे क्षेत्र 'ना-विकास क्षेत्र' आहे. त्यामुळे रिसॉर्ट बांधताना संबंधित मंत्रालयांकडून परवानगी घेण्यात आलेली नाही, असा आरोप तपास यंत्रणांनी केला आहे. 

टॅग्स :न्यायालय