Join us

सदाशिव, डिझेल पेट्रोल स्वस्त होऊ दे, तुला हेलिकॉप्टरची सैर घडवतो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2021 4:00 PM

युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आपल्या ट्विटरवरून एका युवक कार्यकर्त्याला मजेशीर रिप्लाय दिलाय. सदाशिव जरे पाटील या युवक कार्यकर्त्याने सत्यजीत तांबे यांना मेन्शन करुन एक ट्विट केलं होतं.

ठळक मुद्देयुवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आपल्या ट्विटरवरून एका युवक कार्यकर्त्याला मजेशीर रिप्लाय दिलाय. सदाशिव जरे पाटील या युवक कार्यकर्त्याने सत्यजीत तांबे यांना मेन्शन करुन एक ट्विट केलं होतं.

मुंबई - सलग १२ दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे (Petrol Diesel Price Hike ) एकीकडे सामान्य जनता त्रस्त झालेली असताना दुसरीकडे मात्र राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. विरोधकांकडून केंद्रातील भाजप सरकारवर कडाडून टीका होत आहे. काँग्रेस नेते आंदोलन करुन विविध मार्गांनी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही पेट्रल दरवाढीला मागील सरकारच जबाबदार असल्याचं म्हटलंय. त्यावरुनही त्यांच्यावर टीका होत आहे. काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी मजेशीर पद्धतीने पेट्रोल दरवाढीकडे लक्ष वेधलंय. 

युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आपल्या ट्विटरवरून एका युवक कार्यकर्त्याला मजेशीर रिप्लाय दिलाय. सदाशिव जरे पाटील या युवक कार्यकर्त्याने सत्यजीत तांबे यांना मेन्शन करुन एक ट्विट केलं होतं. चक्क स्वप्नात का होईना तुमच्यासोबत फिरण्याचा योग आला. सत्यजीत तांबे, दादा त्या दिवसाची वाट पाहतोय, असे ट्वीट सदाशिव यांनी केले होते. सदाशिवचं ट्विट रिट्विट करत, सत्यजीत तांबे यांनी मजेशीर उत्तर दिलंय.  सदाशिव, डिझेल-पेट्रोल स्वस्त होऊ दे, तुला हेलिकॉप्टरची सैर घडवतो, असे भन्नाट उत्तर तांबे यांनी दिलंय. तांबेंच्या या उत्तराचा नेमका अर्थ काय घ्यायचा असा प्रश्न अनेक नेटिझन्स पडलाय. कारण, पेट्रोल डिझेल स्वस्त होणं, सध्या तरी शक्य नाही. त्यामुळे, सदाशिवला हेलिकॉप्टर सैरही सध्या अशक्यच आहे.

स्वदेशी पेट्रोल आणण्यासाठी प्रयत्नशील

जागतिक बाजारातील कच्च्चा तेल्याच्या किमतींमुळे देशातील पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहे. आता देशातच पेट्रोलची निर्मिती कशी होईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आगामी काळात भारतात तयार झालेले पेट्रोल विक्रीसाठी उपलब्ध तयार करण्यात येईल. लवकरच देशवासीयांना स्वदेशी पेट्रोल मिळेल, असा दावा अश्विनी कुमार यांनी केला. इंधन दरवाढ आणि गॅसच्या वाढत्या किमतींवरून काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली.

सलग १२ व्या दिवशी पेट्रोल दरवाढ

दरम्यान, सलग १२ व्या दिवशी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली आहे. देशभरात पेट्रोल ३९ पैसे तर डिझेल ३७ पैशांनी महागले. भोपाळमध्ये डिझेलने ८९.२३ रुपयांची आतापर्यंतची विक्रमी पातळी गाठली आहे. दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोल ९७ रुपये झाले आहे. मुंबईत एक लीटर डिझेलसाठी ग्राहकांना आता ८८.०६ रुपये मोजावे लागत आहेत. राज्यात परभणीमध्ये पेट्रोलचा भाव सर्वाधिक ९८.७६ रुपये आहे. 

टॅग्स :पेट्रोलसत्यजित तांबेमुंबईकाँग्रेस