‘जीवनविद्या’ परिवारातर्फे सद्गुरूंना आदरांजली
By admin | Published: June 1, 2017 05:57 AM2017-06-01T05:57:32+5:302017-06-01T05:57:32+5:30
‘जीवनविद्या मिशन’तर्फे सद्गुरू वामनराव पै यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन दादरच्या योगी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘जीवनविद्या मिशन’तर्फे सद्गुरू वामनराव पै यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन दादरच्या योगी सभागृहामध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून शिष्यमंडळी मुंबईत दाखल झाली होती.
कार्यक्रमाची सुरुवात, सद्गुरू प्रणित उपासना यज्ञ व विश्व कल्याणकारी विश्वप्रार्थना जप यज्ञाने करण्यात आली. संगीतविद्येत पारंगत शिष्यांनी सद्गुरूंना संगीत जीवनविद्येच्या माध्यमातून आदरांजली अर्पण केली. त्यानंतर सुप्रसिद्ध उद्योजक व सद्गुरूंचे सत्शिष्य डॉ. सुरेश हावरे यांनी सद्गुरूंच्या आठवणींना उजाळा दिला. २२ मे रोजी सद्गुरूंच्या स्नुषा मिलन प्रल्हाद पै यांचीदेखील पुण्यतिथी असल्याने त्यांच्या जीवनविद्येच्या कार्यालाही यानिमित्त सलाम करण्यात आला. तसेच ‘जीवनविद्या मिशन’चे आजीव विश्वस्त आशादीप ढगे व प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ व मिशनचे विश्वस्त आणि अध्यक्ष डॉ. दिलीप पटवर्धन यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. या वेळी जीवनविद्या स्थापना काळातील दिवंगत नामधारकांचेही स्मरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सद्गुरूंच्या धर्मपत्नी शारदामाई, ‘जीवनविद्या मिशन’चे आजीव विश्वस्त प्रल्हाद वामनराव पै व त्यांच्या कुटुंबीयांची उपस्थिती होती. या वेळी प्रल्हाद पै यांनी ‘लव्ह वर्क , ब्लेस आॅल’ या विषयावर मार्गदर्शन केले. जीवनातील प्रत्येकाबाबत कृतज्ञ असण्याचे महत्त्व प्रल्हाददादांनी पटवून दिले. ते पुढे म्हणाले की, ‘कृतज्ञतेचे रूपांतर भावात, स्वभावात, वृत्तीत, कृतीत व त्यातून पुढे स्वप्नपूर्तीत होत असते. सद्गुरूंचा महान संकल्प हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने प्रगतीपथावर जावे हे आहे. या ध्येयपूर्तीसाठी प्रत्येकाने एकमेकांबाबत कृतज्ञ असणे व सर्वांच्या भल्याचा विचार करणे फार गरजेचे आहे.’