मुंबई : एमबीबीएसची विद्यार्थिनी सदिच्छा साने हिच्या हत्या प्रकरणात आरोपी असलेला जीवरक्षक मिठू सिंह याचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. प्रथमदर्शनी आरोपीविरोधात पुरावे आहेत आणि जामिनावर सुटल्यावर आरोपी पुराव्यांशी छेडछाड करू शकतो, असे निरीक्षण न्यायालयाने मिठू सिंहचा जामीन अर्ज फेटाळताना नोंदविले.
भायखळा येथील ग्रँट मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस करणारी सदिच्छा साने २९ नोव्हेंबर २०२१ रोजी तिसऱ्या वर्षाच्या परीक्षेला बसण्यासाठी घराबाहेर पडली, ती घरी परतलीच नाही. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ती वांद्रे येथे उतरून बँड स्टँडला गेली आणि तिथे तिची भेट जीवरक्षक मिठू सिंह याच्याशी झाली. सिंह याने सदिच्छाशी तिच्या मर्जीविरोधात जवळीक साधण्याचा प्रयत्न केला असावा आणि त्यांच्या वादात त्याने तिची हत्या केली असावी, असा पोलिसांना संशय आहे.
सिंह याने जामीन अर्जात सर्व आरोप फेटाळले. आपल्याविरोधात कोणतेही ठोस पुरावे नाहीत आणि सानेची हत्या करण्यामागे आपला कोणताही हेतू आहे, हे दाखविण्यास पोलिस अपयशी ठरले आहेत. या प्रकरणात एकही साक्षीदार नाही, असे जामीन अर्जात म्हटले आहे. न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळताना म्हटले की, आरोपीवर असलेले आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. प्रथमदर्शनी आरोपीचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे दाखविणारे पुरावे आहेत, तसेच आरोपी पुराव्यांशी छेडछाड करू शकतो, ही भीती नाकारता येत नाही, असे म्हणत न्यायालयाने मिठू सिंह याचा जामीन अर्ज फेटाळला.