Join us

गडकिल्ल्यांची ट्रेकरना साद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 1:28 AM

निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी आणि धकाधकीच्या जीवनातून थोडा ब्रेक घेण्याच्या उद्देशाने ट्रेकरनी गडकिल्ल्यांची वाट पकडली आहे.

मुंबई : निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी आणि धकाधकीच्या जीवनातून थोडा ब्रेक घेण्याच्या उद्देशाने ट्रेकरनी गडकिल्ल्यांची वाट पकडली आहे. पावसाळ्यातील आल्हाददायक दृश्य बघण्यासाठी गडकिल्ले ट्रेकरना साद देत आहेत. निसर्गाला मान्सूनमध्ये नवीन रूप येत असून, सुंदर वातावरण, चहू बाजूला हिरवळ आणि पाऊस यांचा अनुभव घेण्यासाठी ट्रेकर गडकिल्ल्यांवर जाण्यासाठी सज्ज झाले आहेत.काही ट्रेकर ग्रुपने वेगवेगळ्या गडांना भेटी देण्याच्या योजना आखल्या आहेत. गडकिल्ल्यांप्रमाणे अनेक जण जंगल, नद्यांच्या ठिकाणी एकदिवसीय किंवा दोन-तीन दिवसीय ट्रेकिंग करण्यासाठी सज्ज झाले आहेत. कॉलेज विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाचा ट्रेकिंगला जाण्याकडे अधिक कल आहे.ठाणे जिल्ह्यातील माहुली, तांदुळवाडी, गोरखगड, रायगड जिल्ह्यातील कर्नाळा, कोंढवी, मृगगड, मानगड, भीमाशंकर, पेठ गड, पेब गड, पुणे जिल्ह्यातील लोहगड, चावंड, नाणेघाट, लोहगड, कोराईगड, तिकोणा, अहमदनगर जिल्ह्यातील कळसूबाई, हरिश्चंद्र, घनगड, नाशिक जिल्ह्यातील हरीहर, रवाळ्या, मोरागड या स्थळांना भेटी देण्याचे ट्रेकरनी योजले आहे.>ट्रेकिंगला जाताना आवश्यक गोष्टीटी-शर्ट, लॉग ट्रेक पॅन्ट किंवा ३/४ पॅन्ट वापरावी. ट्रेकिंगला जाताना सैल कपड्यांचा वापर करावा. पायात उत्तम प्रतीचे बूट घालणे आवश्यक आहे. मौल्यवान वस्तू परिधान करणे टाळावे. दोन लीटरची पाण्याची बाटली, कपड्यांचे आवश्यकतेनुसार जोड, छोटे टॉवेल, टॉर्च, छत्री किंवा रेनकोट, टोपी या वस्तू सोबत बाळगाव्यात. स्वत:कडे प्रथमोपचार पेटी असणे आवश्यक आहे. खाण्यासाठी उष्ण आणि स्निग्ध पदार्थ सोबत ठेवावेत. उदा. शेंगदाणे, गुळ, चिक्की, राजगिरा लाडू, सुका मेवा, थेपले, लसूण चटणी, तूप साखर लावलेली चपाती, घावणे हे पदार्थ असावेत.>धकाधकीच्या जीवनात स्वत:ला वेळ मिळत नाही. ट्रेकिंगच्या माध्यमातून एकमेकांची भेट होते. त्यामुळेच पुढच्या आठवड्यात ट्रेकिंगला विसापूर किल्ल्यावर जाण्याची योजना आखली आहे. ट्रेकिंग करताना मनमोकळे फिरताना शिस्तीचे पालनदेखील करणे आवश्यक आहे. मागील वर्षी २० ते २५ जणांच्या गु्रपने कर्नाळा येथे ट्रेकिंगसाठी गेलो होतो. निसर्गाची सुंदरता अनुभवण्यासाठी ट्रेकिंग हे सुंदर माध्यम आहे.- राजेश बलुगडे, आयोजक, अस्तित्व ट्रेकिंग ग्रुप>ट्रेकिंगच्या माध्यमातून वेगवेगळ्या गडकिल्ल्यांची माहिती मिळून आपल्याला इतिहास कळतो. निसर्गाकडून अनेक नवीन गोष्टी अनुभवायला मिळतात. यात पावसाळी वनस्पतीचे दर्शन होते. पावसाळ्यात गड रोमांचकारी दिसतो. त्याला पाहून नवीन ऊर्जा मिळते. शारीरिक, मानसिक स्वास्थ्य, आध्यात्मिक आणि सामाजिक बांधिलकी ट्रेकिंगमुळे येते. ट्रेकिंगमुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तीच्या ओळखी होतात.- डॉ. तेजस लोखंडे, संस्थापक अध्यक्ष, स्वास्थ्यरंग गडभेट>ही सावधानता बाळगाट्रेकिंग गु्रपमध्ये जास्त गर्दी नसावी. जास्तीत जास्त ३० ते ३५ जणांचा ग्रुप असावा. दोन-तीन जणांनी ट्रेकिंगसाठी जाणे टाळावे.ट्रेकिंग प्रमुखाचा सल्ला ऐकून प्रत्येकाने जबाबदारीने वागावे. गडावर कोणत्याही प्रकाराचा कचरा होता कामा नये याची दक्षता बाळगावी.वृक्षारोपणाच्या उद्देशाने गडावर बिया पेराव्यात किंवा रोपटी लावावीत. ट्रेकिंग करताना सर्पदंश झाल्यास किंवा पाय घसरून हाड मोडल्यास त्वरित प्रथमोपचार करून जवळच्या दवाखान्यात दाखल व्हावे. ट्रेकिंगला कधी, कोणत्या ठिकाणी जाणार याची माहिती पालकांना देण्यात यावी. स्वत:ला कोणती व्याधी असल्यास त्याची कल्पना ट्रेकिंग प्रमुखाला द्यावी.