सफाई कामगारांचा आज ‘विजयी दिन’!
By admin | Published: May 1, 2017 04:29 AM2017-05-01T04:29:41+5:302017-05-01T04:29:41+5:30
मुंबई महानगरपालिकेत कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या २ हजार ७०० सफाई कामगारांना कायम सेवेत घेण्याचे आदेश
मुंबई : मुंबई महानगरपालिकेत कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या २ हजार ७०० सफाई कामगारांना कायम सेवेत घेण्याचे आदेश नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने दिले. महापालिकेविरोधातील हा विजय साजरा करण्यासाठी संबंधित कंत्राटी कामगार, आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी सहकुटुंब आझाद मैदानात सोमवारी दुपारी ३.३० वाजता धडकणार आहेत. कचरा वाहतूक श्रमिक संघाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
संघाचे सरचिटणीस मिलिंद रानडे म्हणाले की, ‘२००७ सालापासून कंत्राटी पद्धतीने महापालिकेत सफाई कामगारांचे शोषण सुरू होते. मात्र, सुरुवातीला औद्योगिक लवादामध्ये जिंकलेल्या कामगारांविरोधात प्रशासनाने उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली. मात्र, ७ एप्रिल २०१७ रोजी सर्वोच्च न्यायालयाने औद्योगिक लवादाचा निर्णय कायम राखत, कामगारांना कायम सेवेत घेण्याचे आदेश कायम राखले आहेत. त्यामुळे गुलामगिरी आणि शोषणाविरोधात मिळवलेला हा विजय साजरा करण्यासाठी सर्व कामगार आझाद मैदानावर जमा होणार आहेत.’
या विजयी दिनी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर उपस्थित राहणार असून, ते कामगारांना संबोधित करतील. याशिवाय संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील स्वातंत्र्य सेनानी कॉम्रेड यशवंत चव्हाण (९६) हे देखील या विजयी मिरवणुकीत सामील होणार आहेत. तरी अधिकाधिक कामगार व कामगार संघटनांनी या ठिकाणी उपस्थिती राहण्याचे आवाहन संघटनेने केले आहे. (प्रतिनिधी)