महिलांचा प्रवास होणार सुरक्षित आणि सुखकर, 'तेजस्विनी' लेडीज स्पेशल बसचे मंगळवारी लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 07:56 PM2021-09-05T19:56:39+5:302021-09-05T19:57:02+5:30
कल्याण: महिलांसाठी विशेष धावणा-या तेजस्विनी बसची प्रतिक्षा अखेर संपली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमाच्या या चार बसचे मंगळवारी ...
कल्याण: महिलांसाठी विशेष धावणा-या तेजस्विनी बसची प्रतिक्षा अखेर संपली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमाच्या या चार बसचे मंगळवारी दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण होणार आहे. त्याचबरोबर कल्याण डोंबिवली शहर दर्शन बस सेवेचाही शुभारंभ होणार आहे.
महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्य सरकारने महिला प्रवाशांसाठी तेजस्विनी बस योजना सुरू केली आहे. केडीएमटी उपक्रमासाठी सरकारकडून बस मंजूर झाल्या. त्यासाठी येणारा भांडवली खर्च म्हणून सरकारकडून उपक्रमाला एक कोटी 20 लाख मंजूर झाले. बस खरेदीसाठी पाच ते सहा वेळा निविदा काढल्या परंतू सुरूवातीला प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान फेब्रुवारी 2021 मध्ये पुन्हा काढण्यात आलेल्या निविदेला मात्र मंजूरी मिळाली आणि या बस उपक्रमाच्या ताफ्यात दाखल झाल्या. विशेष बाब म्हणजे या लेडीज स्पेशल बसमध्ये वाहक म्हणून 12 महिला कर्मचा-यांची नियुक्ती केली आहे. दुसरीकडे शहरातील पर्यटन स्थळांचा लाभ घेण्यासाठी केडीएमटीकडून एक विशेष बस सोडण्यात येणार आहे. त्याचेही लोकार्पण मंगळवारी होत आहे. आगळा वेगळा लूक असलेल्या या बसच्या निर्मितीचे काम जे जे स्कूल ऑफ आर्टसच्या विद्याथ्र्यानी केले आहे. सार्वजनिक सुट्टी, शनिवार, रविवार आणि प्रवाशी मागणीनुसार ही बस धावणार असून त्याचे भाडे प्रति प्रवासी 150 रूपये इतके आहे. कल्याण रेल्वे स्टेशन(पश्चिम), शिवाजी चौक, सुभेदारवाडा, पारनाका अक्षत गणपती, पोखरण, त्रिविक्रम मंदिर, देवीचे देऊळ, दुर्गाडी किल्ला, गणोश घाट (खाडी किनारा), प्रबोधनकार ठाकरे सरोवर( बाळासाहेब ठाकरे स्मारक), टिटवाळा गणपती मंदिर, गोवेली मार्गे बिर्ला मंदिर, सुभाष चौक, वालधुनी ब्रिज मार्गे पुना लिंक रोड मार्गे खिडकाळी शिवमंदिर, पिंपळेश्वर महादेव मंदिर, गणपती मंदिर (डोंबिवली पूर्व), कॅप्टन विनय कुमार सच्चान (आजदे गाव), कल्याण रेल्वे स्टेशन (पश्चिम) ही बस धावेल.
अशी धावणार ‘तेजस्विनी’
कल्याण
कल्याण-रिंगरूट (बिर्ला कॉलेज मार्गे ) धावताना रेल्वे स्टेशन, रामबाग स्टेट बँक, सिंधीगेट, प्रेम ऑटो, बिर्ला कॉलेज, चिकणघर, खडकपाडा, आधारवाडी चौक, वाडेघर, दुर्गाडी चौक, लालचौकी, गणोश टॉवर, तेलवणो हॉस्पिटल, सहजानंद चौक, शिवाजी चौक, गुरूदेव हॉटेल, कल्याण रेल्वे स्टेशन मार्गावर सकाळी 7 ते रात्री पावणोनऊ दरम्यान धावेल. तर कल्याण-मोहना कॉलनी धावताना कल्याण रेल्वे स्टेशन वरून प्रेम ऑटो मार्गे धावताना पुढे शहाड फाटक, आयडीआय गेट, वडवली फाटक, शिवसृष्टी, मोहना गेट, आरएस, मोहना कॉलनी, आंबिवली, गाळेगाव, चैतन्य निवास, मोहीली गाव, मानिवली फाटा, मानिवली, पुन्हा मोहना कॉलनी ते कल्याण अशी बस सकाळी साडेसहा ते रात्री साडेआठ दरम्यान धावेल.
डोंबिवली
डोंबिवली-लोढा हेवन- निळजे स्टेशन या मार्गावर धावताना डोंबिवली स्टेशन (पुर्व), चाररस्ता, गावदेवी, शिवाजी उद्योगनगर, स्टार कॉलनी, संघवी गार्डन, आनंद केमिकल्स, मानपाडा, प्रिमिअर कॉलनी, कोळेगाव फाटा, काटईगाव, लोढा हेवन, शिवाजी चौक, निळजे स्टेशन, तसेच पुन्हा निळजे स्टेशन ते डोंबिवली अशी बस धावेल. डोंबिवली-निवासी विभाग अशीही बस धावणार आहे. यात डोंबिवली स्टेशन, पारसमणी, शेलारनाका, आजदेगाव, पेंढारकर कॉलेज, मिलापनगर, ममता हॉस्पिटल, मॉडेल कॉलेज, निवासी विभाग, पुन्हा डोंबिवली स्टेशन अशी बस धावणार आहे.