- अनिरुद्ध पाटील
विसाव्या शतकाच्या प्रारंभी डहाणू तालुक्यातील घोलवड गावात राहणाऱ्या पारसी कुटुंबीयांनी सफेद जाम (स्थानिक नाव - जांबू) या परदेशी फळझाडाची प्रायोगिक तत्त्वावर त्यांच्या बागायतीत लागवड केली. या फळाची हटके चव, अधिक उत्पादन येत असल्याने घोलवड, बोर्डी आणि डहाणूतील विविध भागांत स्थानिक शेतकऱ्यांनी लागवडीला पसंती दिली. उन्हाळ्यात या फळांना विशेष मागणी असते. या झाडाची लागवड आंतरपीक म्हणून चिकू, नारळ यांच्या फळबागेत केली जाते. या पिकाला मध्यम प्रतीची, उत्तम निचरा होणारी काळी सुपीक जमीन आणि दमट हवामान पोषक आहे.
महिलांनी केला प्रचार – प्रसार
या फळात सुमारे ९० टक्के पाण्याचा अंश असल्याने उन्हाळ्यात सर्वाधिक मागणी असते. प्रारंभीच्या काळात स्थानिक आठवडे बाजार आणि डहाणू, घोलवड या रेल्वे स्थानक परिसरात या फळाची विक्री केली जात होती. पारसी बागायतदारांनी हे फळ मुंबई बाजारात पोहोचवले. मुंबई आणि उपनगरातील वसाहतीत भाजी विकणाऱ्या डहाणूतील महिलांनी या फळाचा प्रचार - प्रसार तेथे केला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याने शहरी बाजारात या फळाने भाव खाल्ला आणि मुंबईच्या विविध बाजारांत मक्तेदारी निर्माण केली आहे. आता शहरांत हे फळ ‘जाम’ या नावाने परिचित आहे.
- किनाऱ्यालगतच्या भागात या झाडाची वाढ जोमाने होते. लागवडीपासून चौथ्या वर्षी फळधारणा होते. पूर्वी केवळ सफेद रंगात उपलब्ध असणारे हे फळ आता लाल, हिरवे, फिके व गडद गुलाबी या रंगात उपलब्ध झाले आहे. - कमी उत्पादन खर्च आणि भरघोस पीक हे या पिकाचे खास वैशिष्ट्य आहे. दोन झाडांमध्ये दहा फुटांच्या अंतरातही पीक चांगले येत असल्याने कमी जागेत जास्त झाडे लावून अधिक उत्पादन घेता येते. - डिसेंबर ते मे हा या फळांचा हंगाम असतो. या काळात तीन वेळा बहार येतो. अति थंडी व उष्णतेमुळे फळगळती होते.