जमीर काझी, मुंबई महानगरातील मॉल्समधील सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर असल्याचे ‘लोकमत’च्या ‘स्टिंग आॅपरेशन’मधून उघडकीस आले आहे. आता त्यावरही कडी करणारी एक धक्कादायक बाब चव्हाट्यावर आली आहे. पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कार्यालय असलेल्या पोलीस आयुक्तालयातील प्रवेशद्वारातील तपासणी कक्षातील मेटल डिटेक्टर व स्कॅनिंग मशीन तब्बल दीड महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे रोज आयुक्तालयात येणाऱ्या हजारांवर अभ्यागतांच्या साहित्याची तपासणी कर्मचाऱ्यांकडून हाताने केली जात आहे. क्रॉफर्ड मार्केट येथे पोलीस आयुक्तांचे कार्यालय आहे. सुमारे सात महिन्यांपूर्वी अभ्यागत कक्षात असलेले पूर्वीचे स्कॅनर मशिन बदलून त्याठिकाणी अद्यावत मशीन बसविण्यात आले. त्याद्वारे त्याठिकाणी येणाऱ्या व्यक्तीकडील पिशवी अथवा बॅगेतील कोणतीही धातूची वस्तू लगेचच संगणकावर दिसते. काही धारदार शस्त्रे किंवा अन्य काही वस्तू मिळाल्यास, त्या-त्या व्यक्तीची अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जाते. मात्र सुमारे दीड महिन्यांपूर्वी या यंत्राचा पट्टा तुटला. तेव्हापासून ते बंद आहे. त्यामुळे सध्या कक्षातील पोलिसांकडून अभ्यागतांच्या पिशवी, बॅगा उघडून तपासल्या जात आहेत. रोज सुमारे ५००,६०० बॅगा तपासाव्या लागत असल्याने कर्मचारीही वैतागून गेले आहेत. मात्र खात्याच्या शिस्तीमुळे त्यांना ‘तोंड दाबून बुक्क्याचा मार’ सहन करावा लागत आहे. दरम्यान, स्कॅनिंग मशिनच्या बिघाडाकडे आपण लक्ष घालू, त्याबाबत आवश्यक कार्यवाही लवकर केली जाईल, असे पोलीस आयुक्तांचे प्रवक्ते उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.
आयुक्तालयातील सुरक्षा वाऱ्यावर!
By admin | Published: August 14, 2015 2:07 AM