- शेफाली परब-पंडितमुंबई : शहरातील गरीब वस्तीमधील लोकांना तत्काळ प्राथमिक उपचार मिळण्यासाठी सुरू करण्यात आलेले आरोग्य केंद्र व दवाखाने काही समाजकंटकांचे लक्ष्य ठरत आहेत. दवाखान्यात जमा रक्कम, संगणकांची चोरी व नासधूससह, अनैतिक कामांसाठीही या जागांचा वापर होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संवेदनशील भागातील ५० दवाखाने व आरोग्य केंद्रांच्या सुरक्षेसाठी यापुढे महापालिकेचा कडक पहारा असणार आहे.मुंबईतील विशेषत: झोपडपट्टी भागात एकूण १७५ दवाखाने आणि २०७ आरोग्य केंद्रे आहेत. सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत या केंद्रांमध्ये प्राथमिक स्वरूपाचे उपचार दिले जातात. याचा फायदा गरजू-गरीब मुंबईकरांना होतो. मात्र या दवाखान्यांतील औषधे, संगणक, फर्निचर, रेफ्रिजरेटर, व्हॅक्सिन, शीतपेटी यांचा साठा असुरक्षित झाला आहे. या वस्तू चोरीला जाण्याचे प्रकार वाढल्याने येथे सुरक्षा रक्षक नेमण्याची ठरावाची सूचना पालिका महासभेत मंजूर करण्यात आली होती.उपरोक्त बाब पालिका प्रशासनानेही मान्य करीत दवाखाने असुरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे दवाखान्याची वेळ संपल्यानंतर म्हणजेच सायं. ४ ते दुसºया दिवशी सकाळी ९ वाजेपर्यंत सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. मुंबईतील संवेदनशील ठिकाणी असलेले ५० दवाखाने व आरोग्य केंद्रांबाहेर हे सुरक्षा रक्षक ‘वॉच’ ठेवणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून लवकरच यावर अंमल होणार आहे.खाजगी ‘रक्षक’ नेमणारसार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत आरोग्य केंद्रे व दवाखान्यांसाठी सुरक्षा रक्षक हे पद अस्तित्वात नाही. त्यामुळे कंत्राटी तत्त्वावर सुरक्षा रक्षक नेमण्यास मंजुरी मिळण्याकरिता प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हे सुरक्षा रक्षक सायं. ४ ते सकाळी ९ म्हणजेच दवाखाना सायंकाळी बंद झाल्यानंतर दुसºया दिवशी सकाळी खुलेपर्यंत त्या ठिकाणी तैनात असणार आहेत.यासाठी हवी सुरक्षा : दवाखाने व आरोग्य केंद्रांमध्ये औषधे, रुग्णांकडून घेतलेल्या केस पेपर शुल्काची रक्कम, संगणक, फर्निचर, रेफ्रिजरेटर, व्हॅक्सिन, शीतपेटी यांचा साठा असतो. सायंकाळी ४नंतर दवाखाने व आरोग्य केंद्रे बंद होतात. त्यानंतर या जागेचा वापर काही समाजकंटक अनैतिक कारवायांसाठी करीत असल्याच्या तक्रारी आहेत. तसेच सामान चोरीला गेल्याच्या अनेक घटना घडल्या असून भविष्यातही धोका कायम आहे.१७५दवाखाने आणि २०७ आरोग्य केंद्रे मुंबईत आहेत. सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत या केंद्रांमध्ये प्राथमिक स्वरूपाचे उपचार देण्यात येतात.
पालिका दवाखान्यांना ‘सुरक्षा’ कवच; ५० संवेदनशील ठिकाणांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 5:02 AM