घुसखोरांना रोखण्यासाठी सुरक्षा कवच
By admin | Published: August 17, 2015 01:07 AM2015-08-17T01:07:03+5:302015-08-17T01:07:03+5:30
म्हाडाच्या संक्रमण शिबिरांमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना वेसण घालण्याचा निर्णय मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने (आर.आर. मंडळ) घेतला आहे
तेजस वाघमारे , मुंबई
म्हाडाच्या संक्रमण शिबिरांमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना वेसण घालण्याचा निर्णय मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने (आर.आर. मंडळ) घेतला आहे. अधिकाऱ्यांच्या संगनमताने आणि त्यांची नजर चुकवून संक्रमण शिबिरांचा ताबा घेणाऱ्या दलालांवर वचक निर्माण करण्यासाठी आर आर मंडळ संक्रमण शिबिरांच्या ठिकाणी खासगी सुरक्षा रक्षक नेमणार आहे. याबाबतचा प्रस्ताव लवकरच म्हाडा प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.
आर आर मंडळाची मुंबई शहर आणि उपनगरात ५६ संक्रमण शिबिरे आहेत. यामध्ये सुमारे १६ हजार १0४ गाळे आहेत. सेसप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासावेळी येथील रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपात संक्रमण शिबिरांमध्ये पाठविण्यात येते. परंतु सेस प्राप्त इमारतींच्या पुनर्विकासावेळी संक्रमण शिबिरांमध्ये स्थलांतरित करण्यात आलेले रहिवासी गेली ४0 ते ४५ वर्षे तिथेच खितपत पडले आहेत. या रहिवाशांचा प्रश्न कायम असतानाच सुमारे १0 ते १२ हजार रहिवाशांनी संक्रमण शिबिरांमध्ये घुसखोरी केली आहे. या रहिवाशांना घराबाहेर काढण्याबाबतचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.
या अपात्र रहिवाशांकडून किरकोळ भाडे आकारून म्हाडा त्यांना वीज, पाणी यांसारख्या सुखसोयी पुरवत आहे. संक्रमण शिबिरांना कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने दलाल टाळे तोडून खोल्या भाड्याने देत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. म्हाडा अधिकाऱ्यांच्या संगनमताने चालणाऱ्या या प्रकारामुळे रिक्त असलेल्या खोल्यांवरही घुसखोर ताबा मिळत असल्याने संक्रमण शिबिरांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.