Join us

सेफ्टी किट निकृष्ट दर्जाचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2020 6:34 PM

चांगल्या दर्जाचे सेफ्टी किट देण्याची मागणी केली आहे.

 

मुंबई : सेफ्टी किट मिळत नसल्यामुळे आणि निकृष्ट दर्जाचे असल्याबाबत महापालिकेच्या जोगेश्वरी पूर्व येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी रूग्णालय प्रशासनाला तक्रारी केल्या आहेत. तसेच चांगल्या दर्जाचे सेफ्टी किट देण्याची मागणी केली आहे.

सेफ्टी किटसाठी वापरण्यात आलेले प्लास्टिक निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे कीट फाटत असल्यामुळे कर्मचाऱ्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. सेफ्टी किटचा अभाव, कोरोना बाधित विभागात काम करण्याची सक्ती, रूग्णालय प्रशासन आणि कंत्राटी संस्था चालकांमार्फत काम करण्यास जबरदस्ती अशा विविध समस्याना तोंड द्यावे लागत असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. रूग्णालयात जवळपास दिडशे कंत्राटी कर्मचारी हाऊस किपींग आणि एमपीएल या प्रकारात काम करत आहेत. रूग्णालय प्रशासन आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये नियोजन नसल्याचे समोर येत आहे. 

 कोरोना विभागातील सर्व स्वच्छता आणि रूग्णांची इतर कामे आम्ही करत असुन सुद्धा आमच्या सुरक्षितेविषयी दुर्लक्ष करत असल्याचे कामगारांनी सांगितले. परिचारिका यांना चार तास काम करण्याची मुभा आहे, तर कर्मचाऱ्यांना आठ तास एकाच विभागात काम करावे लागत आहे. त्यामुळे आठ तास सेफ्टी कीट काढता येत नसल्यामुळे जेवण, टॉयलेट, इतर कामाअभावी कर्मचाऱ्यांचे हाल होत असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. 

 प्रशासनामार्फत देण्यात येत असलेले सेफ्टी किट लहान असल्यामुळे बॉडी पार्ट मधील हात आणि खालील पायाचा भाग खुला असल्यामुळे कोरोना बाधित रुग्णामार्फत संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील कामगार वर्ग सुरक्षित नसल्याची बाब समोर आली आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबईकोरोना वायरस बातम्या