गणेशोत्सवाला सुरक्षा कवच
By admin | Published: September 1, 2016 06:14 AM2016-09-01T06:14:34+5:302016-09-01T06:14:34+5:30
संपूर्ण राज्यासह मुंबईत मोठय़ा उत्साहाने साजरा केला जाणारा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी मुंबई पोलिसांनी शहरात विशेष बंदोबस्त ठेवला आहे.
मुंबई : संपूर्ण राज्यासह मुंबईत मोठय़ा उत्साहाने साजरा केला जाणारा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी मुंबई पोलिसांनी शहरात विशेष बंदोबस्त ठेवला आहे. गणेशोत्सवाच्या काळात वॉच टॉॅवर, सीसीटीव्ही आणि ड्रोनच्या साहाय्याने संपूर्ण शहरावर नजर ठेवण्यात येणार असून, अतिरेकी कारवायांच्या दृष्टीने शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांसह प्रवेशद्वारांवर पोलिसांद्वारे नजर ठेवण्यात आली आहे.
शहरामध्ये सुमारे ७ हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह सव्वा लाख घरगुती गणपतींचे आगमन होते. मोठय़ा गणपतींच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होते. त्यातच येऊ घातलेल्या पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेतेमंडळींकडून हा उत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा केला जाणार आहे. त्यामुळे पोलिसांनी शहरात विशेष बंदोबस्ताची आखणी केली आहे. सर्व पोलिसांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या असून, केंद्रीय आणि राज्य राखीव बलाच्या तुकड्या तैनात ठेवण्यात आल्या आहेत, तसेच एटीएस, बॉॅम्बशोधक व नाशक कक्ष, शीघ्रकृती दल, फोर्स वन तैनात ठेवण्यात आले आहे.