Join us

भगवा झेंडा, दंडावर केशरी पट्टा अन् हिंदू जननायक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 5:55 AM

मनसेचा नवा रागरंग : मोर्चात हिंदुत्वाचा माहोल

मुंबई : मोर्चाला उत्तर मोर्चाने, असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रविवारी मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. नव्याने स्वीकारलेला भगव्या झेंड्याच्या जोडीने तिरंगा ध्वज, भगव्या साड्यांतील महिला, भगवे सदरे घातलेल्या पुरुष कार्यकर्त्यांनीगिरगाव चौपाटी ते आझाद मैदानचा परिसर फुलून गेला होता. मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचा ‘हिंदू जननायक’ हा उल्लेख आणि छत्रपती शिवरायांची राजमुद्रा असणारे दंडावरील केशरी पट्टे मोर्चात लक्ष वेधून घेत होते.

बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हुसकावून लावण्याच्या मागणीसाठी मनसेने गिरगाव चौपाटी येथील हिंदू जिमखाना ते आझाद मैदान असा मोर्चा काढला. सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी गर्दी करायला सुरुवात केली होती. दुपारी दोनपर्यंत जिमखान्याची गर्दी थेट बाबूलनाथपर्यंत पोहोचली होती. कार्यकर्त्यांच्या हातात पक्षाचा नवा झेंडा होता. काही कार्यकर्त्यांनी तिरंगाही घेतला होता. अनेक कार्यकर्त्यांनी राजमुद्रा चिन्हांकित सदरे घातले होते. राजमुद्रा असलेल्या दंडावरील पट्ट्यांनी मात्र सर्वांचेच लक्ष वेधले होते. स्वत: राज ठाकरे यांनी काही नेते आणि सचिवांच्या दंडावर हे पट्टे बांधले. तर, अमित ठाकरे यांनीही आपल्या सहकाऱ्यांच्या हातावर हे पट्टे बांधले.पक्षाच्या राज्यव्यापी अधिवेशनात हिंदुत्ववादी भूमिका स्वीकारल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट संबोधले होते. यावर, हा मान फक्त बाळासाहेबांचा आहे. कोणीही मला ही उपाधी लावू नये, असे राज यांनी बजावले होते. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी आज राज ठाकरे यांचा उल्लेख ‘हिंदू जननायक’ असा करत घोषणाबाजी केली. त्यामुळे येत्या काळात राज यांच्यापुढे हिंदू जननायक ही बिरुदावली रूढ केली जाण्याची शक्यता आहे.

सिद्धिविनायकाचे दर्शनराज ठाकरे यांनी मोर्चा स्थळी पोहोचण्यापूर्वी प्रभादेवी येथे सिद्धिविनायक मंदिरात देवदर्शनकेले. दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास राज ठाकरे कृष्णकुंज निवासस्थानावरून मोर्चासाठी निघाले. या वेळी पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा आणि मनसे नेते अमित ठाकरे आणि अन्य कुटुंबीयांच्या वाहनांचा ताफाही होता.

राज यांच्या ताफ्यालाही गर्दीचा फटकामोर्चासाठी जमलेल्या गर्दीचा फटका स्वत: राज ठाकरे यांच्या वाहनांच्या ताफ्यालाही बसला. मोर्चेकऱ्यांच्या गर्दीमुळे राज यांच्या वाहनांचा ताफा हिंदू जिमखान्यापर्यंत पोहोचण्यास विलंब झाला. दरम्यान, चौपाटीजवळ एका रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून देण्यात आली. राज ठाकरे यांची गाडीसुद्धा बाजूला घेण्यात आली होती.हिंदू जिमखान्यावरून निघालेला मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ विभाजित झाला. येथून राज ठाकरे आणि महत्त्वाचे नेते महापालिका मार्गाने तर मार्चेकरी फॅशन स्ट्रीट मार्गे आझाद मैदानावर दाखल झाले. गर्दीमुळे वरिष्ठ पोलीस अधिकाºयांच्या वाहनाने राज ठाकरे सभास्थळी पोहोचले.मोर्चातील गर्दी मैदानापर्यंत पोहोचली नाहीमेट्रो सिनेमापासून मोर्चा विभागल्याने मोर्चातील गर्दी विस्कळीत झाली. सर्व मोर्चेकरी फॅशन स्ट्रीटमार्गे आझाद मैदानात पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे राज ठाकरे यांनीसुद्धा काही काळ मोर्चेकºयांची वाट पाहिली आणिं त्यानंतरच व्यासपीठ गाठले.

व्यासपीठावर सावरकरांची प्रतिमापक्षाच्या राज्यव्यापी अधिवेशनात अन्य महापुरुषांसोबत वीर सावरकर यांचाही फोटो लावण्यात आला होता. आजच्या सभेतही सावरकर यांचा फोटो व्यासपीठावर लावण्यात आला. तर, राज यांनी सभेची सुरुवात माझ्या हिंदू बांधवांनो, भगिनींनो अशी केली.

पोलिसांचा चोख बंदोबस्तदंगल नियंत्रण पथक, शीघ्र कृती दलाच्या तुकड्या आणि राज्य राखीव पोलिसांच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या होत्या. मोर्चेकºयांवर सीसीटीव्हीने नजर ठेवण्यात आली.

टॅग्स :राज ठाकरेमनसेशिवसेनाहिंदुत्व