मुंबई - भगवा ध्वज ही कोणाचीही मक्तेदारी नाही. म्हणज जो त्यागाचा आहे, शिवाजी महाराजांचा आहे. त्यामुळे जर कोणाला भगवा ध्वज पक्षाची मक्तेदारी वाटत असेल तर ते दुर्दैव आहे, असे म्हणत खासदार अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला टोला लगावला. रयतेचं राज्य आणण्यासाठी, स्वयंप्रेरणेनं हा ध्वज पुढे आला आहे, असे कोल्हे यांनी म्हटले. परभणी जिल्ह्यातून राष्ट्रवादी शिवस्वराज यात्रा बीड जिल्ह्यात दाखल झाली होती, त्यावेळी कोल्हेंनी पत्रकाराच्या प्रश्नावर भगव्या झेंड्याबद्दल स्पष्टीकरण दिले.
राज्यात सध्या तरुणाईचा बदलता कल लक्षात येतोय. तरुणाईमध्ये अस्वस्था असून, तरुणाईला भगव्या ध्वजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर दिसतो. म्हणूनच तरुणाई राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंड्यासोबत भगवा ध्वज घेऊन 'शिवस्वराज्य' यात्रेत सामिल होत आहे. भगवा ध्वज हे महाराष्ट्रातील तरुणाईच्या असंतोषाचे प्रतिक आहे. महाराष्ट्रातील तरुणाईच्या बेरोजगारीला उत्तर मिळत नाही. प्रत्येकवेळी त्यांच्या तोंडाला पानं पुसली जातात. सरकारनं जी घोर निराशा केलीय, त्याचं हे प्रतिक आहे, असे म्हणत अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या यात्रेतील भगव्या ध्वजाचे समर्थन केले आहे.
तसेच, भगवा ध्वज हा कुणाची मक्तेदारी नाही. छत्रपतींचा भगवा पेलण्याची नीतिमत्ता विरोधकांमध्ये नसल्यानेच "भगवा" आम्ही खांद्यावर घेतलाय, असे म्हणत शिवसेनेलाही टोला लगावला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा महाराष्ट्रात फिरत असून सध्या मराठवाड्यात या यात्रेच्या माध्यमातून सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे.