Join us

दोडामार्ग नगरपंचायतीवर भगवा फडकला

By admin | Published: November 02, 2015 10:43 PM

शिवसेना, भाजपला प्रत्येकी पाच जागा : काँग्रेसला ४, राष्ट्रवादीला २, मनसेने फोडला भोपळा

दोडामार्ग : प्रतिष्ठेच्या बनलेल्या कसई दोडामार्ग नगरपंचायतीच्या १७ पैकी १० जागा जिंकत सेना-भाजप युतीने नगरपंचायतीवर युतीचा झेंडा फडकावला. तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला केवळ ६ जागा जिंकता आल्या. मनसेने अनपेक्षितरित्या एक जागा जिंकत आपले खाते खोलले. रविवारी १७ प्रभागातील ४८ उमेदवारांसाठी झालेल्या मतदानाचा निकाल सोमवारी जाहीर झाला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळी १० वाजता येथील तहसील कार्यालयात मतमोजणीला प्रारंभ झाला. टप्प्याटप्प्याने प्रभागांचे निकाल जाहीर करण्यात आले. प्रभाग क्र. १ मध्येच धक्कादायक निकाल लागला. याठिकाणी मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा व अपक्ष अशी चौरंगी लढत होती. येथून मनेसेचे रामचंद्र सोमा ठाकूर यांनी अनपेक्षितरित्या विजय मिळविला. रामचंद्र ठाकूर यांना २६ मते मिळाली. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार सुरेश दादू तुळसकर (राष्ट्रवादी) यांना २३, समीर शशिकांत रेडकर (भाजपा) २१, गोविंद रामा महाले (अपक्ष) यांना १२ मते मिळाली.प्रभाग २ मध्ये अपेक्षेप्रमाणे भाजपच्या वैष्णवी विष्णू रेडकर यांनी विजय मिळविला. त्यांना ६५ मते मिळाली. त्यांच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुशांत राऊत यांना ४० मते मिळाली. प्रभाग ३ मध्ये चौरंगी लढत होती. येथे अपक्ष दोन, तर सेना व काँग्रेसचा प्रत्येकी एक उमेदवार उभा होता. येथून उपमा गोपाळ गावडे या काँग्रेसच्या उमेदवार विजयी झाल्या. त्यांना ४० मते मिळाली. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार प्राजक्ता प्रशांत आंबडोसकर (अपक्ष) १२, रेशमी प्रकाश फुलारी (अपक्ष) ३५, गितांजली गणेश रेडकर (सेना) २६ अशी मते मिळाली. प्रभाग ४ मध्ये लक्षवेधी लढत होती. काँग्रेसच्या संतोष दिनकर नानचे व भाजपाचे राजेश प्रसादी अशा दोन माजी सरपंचांमध्ये लढत होती. याठिकाणी तीन मतांनी काँग्रेसचे संतोष नानचे विजयी झाले. नानचे यांना ५५, तर प्रसादी यांना ५२ मते मिळाली. एकू ण झालेल्या मतदानापैकी तीन मते बाद झाली.प्रभाग ५ मध्ये तिरंगी लढत होती. येथून काँग्रेसच्या विनया विनायक म्हावळंकर विजयी झाल्या. त्यांना ५७ मते मिळाली. तर प्रतिस्पर्धी उमेदवार दीपाली दिलीप नाईक (भाजपा) ४९, सविता संतोष नाईक (अपक्ष) यांना १३ मते मिळाली. प्रभाग ६ मध्ये तिरंगी लढत होती. येथून राष्ट्रवादीच्या साक्षी संदीप कोरगावकर विजयी झाल्या. त्यांना ७० मते मिळाली. प्रतिस्पर्धी उमेदवार फुलराणी ज्ञानेश्वर गावकर यांना ४१, शितल रामचंद्र हरमलकर (सेना) यांना ६४ मते मिळाली. प्रभाग ७ मध्ये माजी जिल्हा जिल्हा परिषद सदस्या संध्या राजेश प्रसादी (सेना) व काँग्रेसच्या उज्ज्वला भागो ताटे यांच्यात दुरंगी लढत होती. याठिकाणी संध्याप्रसादी विजयी झाल्या. त्यांना १०७ मते मिळाली. तर ताटे यांना ४४ मते मिळाली. प्रभाग ८ मध्ये दिवाकर लवू गवस (सेना) व नितीन प्रभाकर मणेरीकर (काँग्रेस) यांच्यात चुरशीची लढत झाली. याठिकाणी गवस केवळ एका मताने विजयी झाले. काँग्रेसचे मणेरीकर यांना ६५, तर गवस यांना ६६ मते मिळाली. विशेष म्हणजे याठिकाणी एक मत बाद झाले. प्रभाग ९ मधून सेनेच्या लीना महादेव कुबल विजयी झाल्या. त्यांना ८० मते मिळाली. तर प्रतिस्पर्धी उमेदवार सरिता नारायण कोरगावकर (अपक्ष) ३७, साक्षी फोंडू हडीकर (काँग्रेस) यांना २२ मते मिळाली. प्रभाग क्र. १० हा भाजपसाठी प्रतिष्ठेचा होता. येथून भाजपाचे शहराध्यक्ष चेतन चव्हाण उभे होते. त्यांना ५२ मते मिळून ते १२ च्या मताधिक्याने विजयी झाले. तर प्रतिस्पर्धी मतदार प्रवीण झालबा (काँगे्रस) यांना ४० मते, पांडुरंग तळणकर (अपक्ष) यांना १२ मते मिळाली. मनसेचे जीवन अंकुश सावंत यांना भोपळाही फोडता आला नाही. प्रभाग ११ मधून सेनेच्या सुषमा लवू मिरकर विजयी झाल्या. त्यांना ६६ मते मिळाली. तर अदिती अजय मणेरीकर (राष्ट्रवादी) यांना ५३ मते मिळाली. प्रभाग १२ मध्ये तिरंगी लढत होती. येथून अरूण विठ्ठल जाधव (राष्ट्रवादी) यांना ४३ मते मिळाली व ते विजयी झाले. तर प्रतिस्पर्धी उमेदवार गणपत बाळा जाधव (आरपीआय) यांना २६ व गौरेश जाधव (भाजपा) यांना २५ मते मिळाली. प्रभाग १३ मधून प्रमोद बाबू कोळेकर विजयी झाले. त्यांना ५४ मते मिळाली. ते भाजपाच्या तिकिटावर उभे होते. तर प्रतिस्पर्धी उमेदवार रामराव ज्ञानेश्वर गावकर (अपक्ष) यांना १२, सत्यवान प्रभाकर नाईक (मनसे) यांना १४, गोविंद रामदास शिरोडकर (राष्ट्रवादी) यांना ४५ मते मिळाली. प्रभाग १४ मधून काँग्रेसच्या हर्षदा हनुमंत खरवत विजयी झाल्या. त्यांना ८१ मते मिळाली. तर सेनेच्या प्रतिभा प्रताप नाईक यांना ६० मते मिळाली. प्रभाग १५ मध्ये रेश्मा उद्देश कोरगावकर (भाजपा) या विजयी झाल्या. त्यांच्या प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या उमेदवार अलका विठू ताटे यांना ६० मते मिळाली. प्रभाग १६ मधून भाजपाचे सुधीर सुरेश पनवेलकर विजयी झाले. त्यांना ६७ मते मिळाली. याठिकाणी रवींद्र खडपकर (मनसे) यांना ७, बाबू कानू बोडेकर (काँग्रेस) यांना ३६ मते मिळाली. प्रभाग १७ मधून सेनेचे संतोष विश्राम म्हावळंकर विजयी झाले. त्यांना ४३ मते मिळाली. येथून प्रतिस्पर्धी उमेदवार नीलेश गवस (अपक्ष) यांना ३६, संदीप गवस (राष्ट्रवादी) यांना २१ मते मिळाली आहेत. (प्रतिनिधी)तीन मतांनी विजय : ‘गड आला पण सिंह गेला’या निवडणुकीत प्रभाग ४ मध्ये भाजपाचे नगराध्यक्षपदाचे दावेदार राजेश प्रसादी यांना माजी सरपंच संतोष नानचे यांच्याकडून केवळ तीन मतांनी पराभवास सामोरे जावे लागले. त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमधून ‘गड आला पण सिंह गेला’, तर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून ‘सिंह आला पण गड गेला’, अशी प्रतिक्रिया उमटत होती.कसई दोडामार्ग नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक असल्याने राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची बनविली होती. युती व आघाडीच्यावतीने राज्यस्तरीय नेते प्रचारात उतरले होते. अनेक ठिकाणी एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रकारही झाले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात कसई दोडामार्ग नगरपंचायतीच्या निकालाची उत्सुकता सुरू होती.